प्रतिनिधी / कोल्हापूर
घटस्फोटीत पत्नीने दोन मुलांसह आपल्याला बटाटेवडय़ात विष घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार शनिवारी तरुणाने सीपीआर चौकीत दिले. यानंतर पत्नीला नातेवाईकांसमोर मारहाणही केली. दोन मुलांसह जखमी पत्नीवर सीपीआरमध्ये उपचार सुरू असून, याप्रकरणाची चौकशी पन्हाळा पोलीस करीत आहेत.
याप्रकरणी सीपीआर पोलीस चौकीतून समजलेली माहिती अशी, पन्हाळा तलुक्यातील एका गावातील तरूणाचा 2007 ला विवाह झाला होता. त्याला दोन मुले आहे. विवाहानंतर काही वर्षांनी मतभेदांमुळे दाम्पत्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सहा महिन्यापूर्वी त्यांचा घटस्फोट अर्ज मंजुर झाला. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शुक्रवारी घटस्फोटीत पत्नी आपल्या आई-वडील आणि बहिणीसह मुलांना भेटण्यासाठी कोल्हापूरात आली. तिने मुलांना आणि पती खाण्यासाठी वडे व केळे घेतली होती.
पत्नीला तिच्या बहिणीकडे सोडण्यासाठी पती कारने जात होता. यावेळी तिने मुलांना व पतीला वडे आणि केळी खाण्यास दिली. कार चालवत असल्याने पतीने फक्त केळच खाले. तर मुलांनी वडे खाल्ले. थोडय़ाच वेळ्यात मुलांना उलटया व जुलाब सुरू झाल्या. मुलांना त्वरीत सीपीआरमध्ये दाखल केले. घटस्फोटी पत्नीने विष घालुन मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत पतीने तिला बेदम मारहाण केली. ती जखमी झाली असून तिलाही सीपीआरमध्ये दाखल केले आहे. पन्हाळा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलजा पाटील यांनी याप्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.