रेणुकानगर खूनप्रकरण अनैतिक संबंधातून ः 48 तासांमध्ये लावला छडा
प्रतिनिधी/ बेळगाव
रेणुकानगर येथे गवतगंजीत घालून पेटवून खून करण्यात आलेल्या युवकाची ओळख पटली असून या खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे. अनैतिक संबंधातून हा थरार घडला आहे. याप्रकरणी कणबर्गी येथील एका युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. केवळ 48 तासांत या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलीस दलाला यश आले आहे.
संतोष नारायण परीट (वय 36, रा. चंदगड, जि. कोल्हापूर) असे खून झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. याप्रकरणी परशराम आप्पाण्णा कुरबर (वय 35, रा. कणबर्गी) याला अटक करण्यात आली असून त्याच्या जवळून एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी ही माहिती दिली.
बुधवार दि. 2 मार्च रोजी सकाळी खुनाचा हा प्रकार उघडकीस आला होता. रेणुकानगरजवळील शेतवडीत गवतगंजीत घालून पेटवून देण्यात आल्याने कोळसा झालेल्या अवस्थेतील युवकाचा मृतदेह माळमारुती पोलिसांनी ताब्यात घेतला होता. त्याचदिवशी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवार दि. 1 मार्च रोजी सायंकाळी 7.30 ते 2 मार्चच्या सकाळी 9.30 यावेळेत ही घटना घडली होती.
मृतदेहाचा अक्षरशः कोळसा झाला होता. त्यामुळे ओळख पटविणेही कठीण झाले होते. अशा परिस्थितीत माळमारुतीचे पोलीस उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार व त्यांच्या सहकाऱयांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पाटील, उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार, प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक श्रीशैल हुळगेरी आदींनी ही कारवाई केली.
सीसीटीव्ही फुटेजवरून उलगडा
उपलब्ध माहितीनुसार सीसीटीव्ही फुटेजवरून या खुनाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. बुधवारी सकाळी खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर माळमारुतीचे पोलीस उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी मोटारसायकलवरून रेणुकानगरकडे जाताना दोघेजण दिसले. त्यामुळेच या खुनाचा उलगडा झाला. पोलिसांनी मोटारसायकल कोणाची? याचा शोध घेतला असता संशयित आरोपीविषयी माहिती मिळाली.
अनैतिक संबंधातून खून
खून झालेल्या संतोष परीटची पत्नी रूपा व आरोपी परशराम कुरबर यांच्यात अनैतिक संबंध आहेत. एक वर्षापासून रूपा कणबर्गी येथील परशरामच्या घरी राहते. मंगळवारी संतोष आपल्या पत्नीला भेटण्यासाठी कणबर्गीला आला होता. भेटून परत जाताना कणबर्गी बसस्थानकावर परशरामने संतोषला पाहिले. मोटारसायकलवरून त्याला रेणुकानगर येथील शेतवडीत नेऊन दारू पाजण्यात आली. नशेत असलेल्या संतोषचा टॉवेलने गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर गवतगंजीत घालून त्याला पेटविण्यात आले.