प्रतिनिधी/ मडगाव
मडगाव नगर पालिकेजवळ पत्रकार गॅरी आझावेदो यांना मारहाण केल्याच्या आरोपावरुन मडगावच्या न्यायालयाने या प्रकरणातील दोन आरोपींना बुधवारी दोषी ठरविले.
खारेबांद मडगाव येथील रमझान सुर्ली (35) व श्रीमती बिबीझान अक्की (28) याना न्यायालयाने दोषी ठरविले. या दोन्ही आरोपींना किती शिक्षा द्यावी यावर न्यायालयात लवकरच युक्तिवाद होणार आहे.
मडगावचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी राम प्रभुदेसाई यांच्या न्यायालयाने हा निवाडा दिला. सरकारपक्षातर्फे सरकारी वकील राजाराम देसाई यांनी काम पाहिले. मडगाव पोलीस स्थानकाचे तत्कालीन साहाय्यक उपनिरीक्षक रामचंद्र पागी यांनी या प्रकरणाचा तपास केला होता.
न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रानुसार मारहाणीची ही घटना 4 जुलै 2017 रोजी सायंकाळी 7.15 वाजण्याच्या सुमाराला घडली होती. मडगाव पालिका इमारतीच्या खाली काहीजण चपला दुरुस्त करण्याचे काम करतात. तक्रारदार गॅरी आझावेदो हे इमारतीच्या खालून जात असताना त्याची चुकून या कामगारांच्या एका वस्तुला पायाची ठोकर बसली. याच कारणावरुन वरील दोन्ही आरोपींनी श्री. आझावेदो यांना मारहाण केली व शिव्या दिल्या.
या प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली. चौकशी अधिकाऱयाने या प्रकरणी चौकशी करुन वरील दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला आणि न्यायालयात आरोपपत्र सादर केले. या प्रकरणी एकूण 3 साक्षिदारांनी न्यायालयात साक्ष दिल्या. साक्ष व पुरावे यावर आधारुन न्या. राम प्रभुदेसाई यांनी वरील दोन्ही आरोपींना भारतीय दंड संहितेच्या 323 कलमाखाली दोषी ठरविले. या आरोपींना लवकरच शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.