ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
हाथरस प्रकरणात हिंसाचार भडकवण्याचा कट रचल्याच्या आरोपावरून पत्रकार सिद्दिक कप्पन याला सर्वोच्च न्यायालयाने पाच दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. केरळमध्ये असलेल्या आजारी आईला भेटण्यासाठी न्यायालयाने सिद्दिकला काही अटींसह जामीन मंजूर केला आहे.
सिद्दिकच्या आईची प्रकृती खालावली असून, ती मृत्यूच्या दारात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सिद्दिकला पाच दिवसांचा जामीन देऊन आईला भेटण्याची परवानगी दिली आहे.
सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश पोलीस सिद्दिकला केरळमधील त्याच्या घरी घेऊन जातील. त्यावेळी पोलीस घराबाहेर पहारा देतील. त्यावेळी केरळ पोलीस तेथील उत्तर प्रदेश पोलिसांना सहकार्य करतील. मात्र, सिद्दीकी आपल्या आजारी आईला भेटतील, तेव्हा पोलीस तिथे उपस्थित राहणार नाहीत, असेही न्यायालयाने सांगितले. सरन्यायाधीशांच्या खंडपीठात न्यायमूर्ती ए एस. बोपण्णा आणि व्ही. रामसुब्रमण्यम यांचाही समावेश होता.