प्रतिनिधी/ मडगाव
मराठी भाषेचे कट्टर समर्थक तथा मठग्रामातून प्रसिद्ध होणाऱया दै. राष्ट्रमत या दैनिकांचे माजी संपादक ज्येष्ठ पत्रकार सीताराम टेंगसे (85) यांचे काल मंगळवारी सकाळी 9.15 च्या दरम्यान मडगावातील एका खासगी हॉस्पिटलात निधन झाले. गेले काही दिवस प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने गोव्याने एक तत्वनिष्ठ व पुरोगामी विचारांचा पत्रकार गमावला आहे.
काल मंगळवारी संध्याकाळी मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पूत्र अरविंद यांनी मंत्राग्नी दिला. त्यांच्या पश्चात पत्नी उल्हासिनी, पूत्र अरविंद, कन्या व नातू असा परिवार आहे.
सीताराम टेंगसे हे मूळ शेळी-लोलये (काणकोण) येथील असून ते नावेली-मडगाव येथे स्थायिक झाले होते. सुरवातीला काणकोण येथील निराकार विद्यालयात आणि नतंर मडगावच्या दामोदर विद्यालयात शिक्षक म्हणून योगदान दिले. त्यांनी असंख्य विद्यार्थी घडविले.
पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी सुरवातीला 1965 साली मडगावात ‘गोमंतवाणी’ दैनिकात काम केले. त्यानंतर ‘दै. राष्ट्रमत’ मध्ये सहसंपादक म्हणून रूजू झाले. या ठिकाणी कार्यकारी संपादक व स्व. चंद्रकांत केणी हे राष्ट्रमतमधून निवृत्ती झाल्यानंतर राष्ट्रमतच्या शेवटच्या तीन वर्षांसाठी संपादक म्हणून काम पाहिले.
सीताराम टेंगसे सामाजिक कार्यातही सक्रीय होते. मडगावच्या गोमंत विद्या निकेतन या संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते होते. या संस्थेची पदे त्यांनी भुषविली होती. समता आंदोलन, अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता.
काल त्यांच्या निधनाची वार्ता मिळताच नावेलीचे माजी आमदार आवेर्तान फुर्तादो, फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक, गोमंत विद्या निकेतन संस्थेचे अध्यक्ष जनार्दन वेर्लेकर, सुहास नायक, समाज सेवा संघाचे अध्यक्ष सुदिन नायक, उद्योजक दत्ता नायक यांनी निवासस्थांनी भेट देऊन सीताराम टेंगसे यांचे अंत्यदर्शन घेतले. अंत्यसंस्काराला उपमुख्यमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगांवकर, पत्रकार प्रमोद आचार्य, राजू नायक, संदेश प्रभुदेसाई, राजेंद्र देसाई, मडगावचे ज्येष्ठ वकिल क्लियोफात कुतिन्हो, निवृत्त प्राचार्य डॉ. नारायण देसाई, प्रशांती तळपणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
अनेक मान्यवरांची श्रद्धांजली
मडगावचे आमदार तथा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सीताराम टेंगसे यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले असून सीताराम टेंगसे हे एक तत्वनिष्ठ व निर्भीड पत्रकार होते. सत्याची कास धरून ते जीवन जगले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. माजी संपादक, पत्रकार, लेखक सीताराम टेंगसे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाले. त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात सहभागी आहोत अशी प्रतिक्रीया माजी आमदार दामू नाईक यांनी व्यक्त केली आहे. दक्षिण गोव्याचे माजी खासदार ऍड. नरेंद्र सावईकर यांनीही ज्येष्ठ पत्रकार सीताराम टेंगसे यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.
पत्रकारितेत मी माझे गुरू गमावले ः प्रभुदेसाय
माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखद दिवसांपैकी एक. पत्रकारितेत मी माझे गुरु गमावले. सीताराम टेंगसे सर, एक उत्कृष्ट पत्रकार, त्यांनी मला शिकवले नाही, मी त्यांच्याकडून शिकलो. त्यांचे जाणकार बोलणे, त्यांचे अभ्यासपूर्ण धाडसी लेखन, वैयक्तिक जीवनातील त्यांचे ‘वॉक द टॉक’, त्यांच्या आंतरजातीय प्रेमविवाहासाठी आमच्या लोलये गावातील एक मॉडेल ज्यासाठी त्यांच्या उच्च जातीच्या समाजाने बहिष्कार टाकला होता, एक वचनबद्ध शिक्षक, भाषांवर त्यांचे प्रभुत्व, संपूर्ण समाजाबद्दलचे त्यांचे विस्तृत आणि सखोल ज्ञान, त्यांचे तर्कशुद्ध दृष्टिकोन, त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, त्यांनी जपलेली मानवी मूल्ये आणि काय नाही. गोव्यातील पत्रकारितेने एक अनोळखी प्रतीक गमावले आहे. सर, मी तुमच्या मार्गावर चालण्याचे वचन देतो, तरीही मला माहीत आहे की मी त्या उंचीवर पोहोचू शकत नाही अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार संदेश प्रभुदेसाय यांनी व्यक्त केली आहे.
सामाजिक-राजकीय जीवनात महत्वाची भूमिका बजावली
दैनिक राष्ट्रमतचे संपादक म्हणून त्यांनी गोव्यातील लोकांच्या सामाजिक-राजकीय जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि समाजवादासाठी ते सदैव सामान्य लोकांच्या बाजूने होते. ते वचनबद्ध पत्रकार होते आणि स्वतःच्या अटींवर जीवन जगले अशी प्रतिक्रिया ऑल इंडिया टेड युनियन काँग्रेसचे अध्यक्ष प्रसन्न उटगी यांनी व्यक्त केली आहे.