ज्यांना सुखवस्तू कुटुंबात जन्म मिळालेला असतो त्यांचे शिक्षण विनासायास पार पडण्याची शक्मयता अधिक असते. त्यांना स्वतःला शिक्षणात रस असेल तर पैसा किंवा साधनसामुग्रीच्या कमतरतेमुळे शिक्षण थांबले असे त्यांच्याबाबतीत घडत नाही. तथापि हे भाग्य सर्वांसाठी नसते. अशाच गरीब परिस्थितीत जन्माला आलेली एक विद्यार्थिनी फुटपाथवर बसून स्ट्रीट लाईटच्या (पथदीप) उजेडात अभ्यास करत असलेला एक व्हिडिओ सध्या प्रचंड लोकप्रिय झाला आहे.
हा व्हिडिओ पाहून अनेकांनी या विद्यार्थिनीला सहाय्य करण्याची तयारी दर्शविली आहे. हा व्हिडिओ इन्स्टॉग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ही विद्यार्थिनी आपल्या शाळेच्या गणवेषात रात्री उशिरापर्यंत रस्त्याकडेला फुटपाथवर बसून अभ्यास करताना दिसून येते. ही विद्यार्थिनी रस्त्याशेजारच्या झोपडपट्टीत राहणारी आहे. झोपडपट्टीत रात्रीच्यावेळी दिवे नसल्याने तिला रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करावा लागत आहे. तिच्या निर्धाराचे सर्वांकडून कौतूक होत आहे. रस्त्यावरून जाणाऱया एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये तिचा हा अभ्यास करतानाचा व्हिडिओ शूट केला आहे. आतापर्यंत पाहिलेला हा सर्वोत्कृष्ट व्हिडिओ असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. वास्तविक रस्त्याकडेला बसून सार्वजनिक दिव्यांखाली अभ्यास करणे वाटते तितके सोपे नाही. रस्त्यावरील वाहनांची गर्दी, बघ्यांची गर्दी, डास आणि चिलटांचा त्रास, मोकाट कुत्र्यांचे भय, वारा इत्यादी अडचणी घराबाहेर मोठय़ा प्रमाणावर असतात. सार्वजनिक दिव्यांचा प्रकाशही म्हणावा तसा प्रखर नसतो. घरच्यासारखी सोय रस्त्यावर होऊच शकत नाही. तरीही ही विद्यार्थिनी अशाप्रकारे विद्याभ्यास करीत असताना दिसून येते.