बांदिवडे बुदुक ग्रामस्थांनी केला आरोप : जिल्हाधिकारी, मालवण पं. स.कडे तक्रार : दहा पैकी फक्त चारच खांब केले उभे!
प्रतिनिधी / मालवण:
बांदिवडे बुद्रुक येथील शिळवाडी येथे मंजूर असलेल्या पथदीपांसाठी वीज खांब न बसविता आयबीमचे तुकडे वेल्डिंग करून बसविण्यात आल्याचा धक्कादायक आरोप ग्रामस्थांनी करत जिल्हाधिकाऱयांसह पंचायत समितीकडे दाद मागितली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, बांदिवडे (बुद्रुक) गावातील शिळवाडी ग्रामस्थांतर्फे रस्त्यावरील दिवाबत्तीसाठी करण्यात आलेल्या वारंवार प्रयत्नानंतर शासनस्तरावरून 1 लाख रुपये मंजूर करण्यात आले. यात 10 पथदीपांसाठी खांब बसवून द्यावेत, असे नमूद केले होते. बांदिवडे (बुद्रुक) ग्रामपंचायतीने खांब बसविण्याचे काम सुरू केले होते. आता आठ महिने झाले फक्त चार खांब उभे करण्यात आले परंतु रस्त्यावरील खांबांची उंची शासनाच्या नियमानुसार 16 ते 18 फुटी असणे आवश्यक असताना ग्रामपंचायतीने फक्त 12 फुट उंचीचे लोकल कामासाठी (छपरासाठी) वापरण्यात येणाऱया लोखंडी आयबीमचे तुकडे वेल्डिंग करून लावण्यात आले आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, खांब उभारण्याचे काम आता आठ महिने झाले तरी अजून केले जात नाही. ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता, दोन दिवसांत काम करतो, कधी वायरमन नाही, कधी कामगार नाही अशी उत्तरे दिली जातात. ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांची फसवणूक होत असल्याचा आरोप शिळवाडी ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी, पंचायत समितीकडे ग्रामस्थांनी दाद मागितली आहे. शासनाने निश्चित केलेले असताना वीज खांब उभे न करता, दुसरेच खांब उभे करून ग्रामस्थांची फसवणूक केल्याप्रकरणी ग्रामपंचायतीवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच एक लाख रुपये मंजूर असतानाही अद्याप पथदीप उभारणी होत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक बनले आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद न मिळाल्यास मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचाही इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.