प्रतिनिधी / कोल्हापूर
पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका कोणत्याही वेळी घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदार नोंदणी वाढविण्यावर भर देत निवडणुकांच्या कामाला सुरूवात करा, अशा सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केल्या.
प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी बुधवारी शहरातील भाजपच्या पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
भाजपच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत त्यांनी विविध गोष्टींवर चर्चा केली. पदाधिकाऱयांची मते जाणून घेतली. आगामी काळात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुका आहेत. त्यासाठी अंतिम टप्प्यात जास्तीत जास्त मतदार नोंदणी करा. बूथ रचना, मतदारांशी संपर्क वाढावा, पक्ष देईल त्या उमेदवाराला आपल्याला निवडून आणायचे आहे. त्यासाठी तयारीला लागा, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केल्या.
यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस हेमंत आराध्ये, महापालिकेतील विरोधी पक्ष नेते विजय सूर्यवंशी, गटनेते अजित ठाणेकर, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, भरत काळे, डॉ. राजवर्धन, अमोल पालोजी, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष गायत्री राऊत यांच्यासह भाजप मंडल, युवा मोर्चा आणि महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.