प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्यात पदवीधर, शिक्षक विधान परिषद निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. पण पदवीधरांच्या एकूण मतदानापैकी 5 टक्के नोंदणी झाली आहे. नोंदणीला कोरोना साथीमुळे कमी वेळ मिळाला आहे. गठ्ठा मतदान नोंदणी झाली आहे. मतदारयाद्या तयार करण्याची प्रकियाच बेकायदेशीर आहे. त्यामुळे या निवडणुकीला स्थगिती मिळावी, अशी मागणी उच्च न्यायालयात केली आहे. यावर सुनावणी झाली. 24 रोजी होणाऱया सुनावणीत केंद्र, राज्य निवडणूक आयोग म्हणणे सादर करणार आहे. त्यानंतर पदवीधर निवडणूक प्रक्रियेला न्यायालय स्थगिती देऊ शकते, असे ऍड. असीम सरोदे यांनी स्पष्ट केले.
येथील पेस क्लबमध्ये शुक्रवारी ते पत्रकारांशी बोलत होते. ऍड. सरोदे म्हणाले, उच्च न्यायालयात न्यायमुर्ती एस. एस. शिंदे, न्यायमुर्ती जमादार यांच्या खंडपीठासमोर पदवीधर निवडणुकीसंदर्भातील याचिकांची सुनावणी सुरू आहे. पदवीधर निवडणुकीसाठी किमान 50 टक्के मतदार नोंदणी होणे अपेक्षित आहे. पण ती 5 ते 6 टक्के झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक स्थगित करावी, अशी मागणी लक्ष्मण चौहान यांनी याचिकेद्वारे केली आहे. यावर झालेल्या सुनावणीत केंद्र, राज्य निवडणूक आयोगाला म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 24 डिसेंबरला यावर सुनावणी होणार आहे.
पदवीधर निवडणुकीसाठी झालेल्या एकगठ्ठा मतदान नोंदणीलाही आक्षेप घेतला आहे. पुरेशी नोंदणी होण्यास कोरोनासह अनेक कारणे आहेत. त्यामुळे 50 टक्के मतदार नोंदणी होईपर्यत या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे म्हणणे आल्यानंतर न्यायालय यासंदर्भात निर्णय घेईल. त्यामुळे या निवडणुकांना स्थगिती मिळू शकते, अशी शक्यता ऍड. सरोदे यांनी व्यक्त केली आहे.