प्रथमदर्शनी राष्ट्रवादीचे अरुण लाड, काँग्रेसचे जयंत आसगावकर यांच्याकडे मतदारांचा कल
प्रतिनिधी / पुणे
पुणे पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीत सुमारे एक लाख मतपत्रिकांची छाननी रात्री उशिरा पूर्ण झाली. त्यात राष्ट्रवादीचे अरुण लाड व काँग्रेसचे जयंत आसगावकर यांच्या बाजूने मतदारांचा कल झुकल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. शेवटचे वृत्त हाती आले, तेव्हा एक लाख मतांच्या छाननीत लाड यांनी 15 हजार मतांनी, तर आसगावकर यांनी साडेचार हजार मतांनी आघाडी घेतली होती. दरम्यान, उर्वरित मतपत्रिकांची छाननी, विजयासाठीची कोटानिश्चिती, पसंतीक्रम आदी प्रक्रिया पाहता अधिकृत निकाल शुक्रवारीच जाहीर होण्याची चिन्हे आहेत.
पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पदवीधरमध्ये 65 ते 70 हजार मतांची छाननी झाली, तेव्हा छाननीमध्ये लाड यांनी आपली आघाडी दहा हजारांवर नेली होती. तर लाखभर मतांच्या छाननीत त्यांची आघाडी 15 हजारांपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे भाजपाचे संग्राम देशमुख पिछाडीवर पडले. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात एकूण 57.96 टक्के मतदान झाले होते. पदवीधरच्या एका जागेसाठी लाड, भाजपाचे संग्राम देशमुख, मनसेच्या रुपाली पाटील, अपक्ष श्रीमंत कोकाटे यांच्यासह 62 उमेदवार रिंगणात होते. शिक्षक मतदारसंघात एकूण 73.04 टक्के मतदान झाले. एका जागेसाठी 35 उमेदवार रिंगणात होते. यात आसगावकर यांनी आघाडी घेतली होती. तर विद्यमान आमदार दत्तात्रेय सावंत दुसऱया क्रमांकावर होते. भाजपाचे जितेंद्र पवारही पिछाडीवर पडले होते.
2200 मतपत्रिकांचा एक गठ्ठा तयार करण्यात आला असून, एकूण 112 टेबलवर छाननी सुरू आहे. छाननी पूर्ण झाल्यानंतर वैध मत पत्रिकांमधील पहिल्या पसंतीच्या क्रमांकाच्या मतांची मोजणी करताना जो उमेदवार विजयासाठी निश्चित करण्यात आलेला कोटा पूर्ण करेल, तो उमेदवार विजयी ठरेल. मात्र, पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोटा पूर्ण करण्यास उमेदवार अयशस्वी झाल्यास दुसऱया पसंतीच्या मतांची मोजणीदेखील केली जाईल. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल. आत्तापर्यंतच्या झालेल्या मतपत्रिकांच्या छाननीनंतर मतदारांचा कल महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड, तर शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या बाजूला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये पुढे असून, माजी आमदार दत्तात्रय सावंत आणि भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांनीदेखील चांगली मते घेतली आहेत. तसेच मते बाद होण्याचे प्रमाणदेखील अधिक आहे.