प्रतिनिधी / कारवार
पदवीपूर्व शिक्षण खात्यातील कर्मचाऱयांचे राज्यस्तरिय शैक्षणिक संमेलन शनिवार दि. 12 रोजी येथील जिल्हा रंगमंदिरात आयोजित करण्यात आल्याची माहिती कारवार जिल्हा पदवीपूर्व महाविद्यालयांच्या प्राचार्य संघाचे गौरव अध्यक्ष आणि पदवीपूर्व शिक्षण खात्याचे उपसंचालक हनुमंतप्पा निट्टूर यांनी दिली. ते येथील पत्रकार भवनात पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, संमेलनाच्यावेळी राष्ट्रीय नूतन शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या व्यतिरिक्त संमेलनाचे औचित्य साधून पदवीपूर्व शिक्षण खात्यातील कर्मचाऱयांच्या विविध समस्यांवर चर्चा घडवून आणण्यात येणार आहे. संमेलनाचे उद्घाटन प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांच्या हस्ते केले जाणार आहे. नूतन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने पुढील शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. नवीन अभ्यासक्रमाबद्दल निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न मंत्री नागेश संमेलनाच्यावेळी करणार आहेत, असे सांगून निट्टूर पुढे म्हणाले. परीक्षांचा हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. हे खरे असले तरी संमेलन परीक्षा कार्याच्या आड येणार नाही. या संमेलनात बेळगाव, कारवारसह उत्तर कर्नाटकातील जिल्हय़ातील सुमारे एक हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत, असे निट्टूर यांनी सांगितले.
संमेलनावर दोन लाख खर्च अपेक्षित
जिल्हा प्राचार्य संघाचे अध्यक्ष प्राचार्य गणेश नायक या प्रसंगी बोलताना म्हणाले, कारवार जिल्हय़ात पहिल्य़ांदाच नूतन राष्ट्रीय शिक्षण धोरणात चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनावर सुमारे दोन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. संमेलनासाठी आदल्या दिवशी कारवारात दाखल होणाऱया कर्मचाऱयांसाठी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे औचित्य साधून पदवीपूर्व खात्यातील निवृत्त कर्मचाऱयांचा आणि पीयुसी द्वितीय वर्ष वार्षिक परीक्षेतील गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वि. प. सदस्य एस. व्ही. संकनूर असतील. स्थानिक आमदार रुपाली नाईक आणि वि. प. सदस्य गणपती उळवेकर अतिथी या नात्याने उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्राचार्य पी. के. राणे, प्राचार्य स्टॅनी पिंटो, प्राचार्य वसंत गांवकर, प्राचार्य रमेश पनेकर, प्राचार्य उदय पवार, प्रा. दिलीपकुमार नाईक, प्रा. होन्नप्पया गुणगा आदी उपस्थित होते.