परीक्षा व मूल्यमापन मंडळ आणि अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत शिफारस
विद्यापरिषदेच्या बैठकीत शिक्कामोर्तब
विद्यापीठ अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधा उपलब्ध करणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पदवीच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याच्या दृष्टीने विद्यापीठात बैठका सुरु आहेत. रविवारी परीक्षा व मूल्यमापन मंडळ, आणि अधिष्ठाता मंडळाच्या झालेल्या बैठकीत शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन पध्दतीने घेण्याची शिफारस करण्यात आली. यावर आज (7 सप्टेंबर) होणार्या विद्या परिषदेच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. त्यादृष्टीने विद्यापीठ प्रशासनाने अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधा उपलब्ध करण्याची तयारी दर्शवली आहे.
राज्यशासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करीत शिवाजी विद्यापीठाच्या पदवी अंतिम सत्राच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यासंदर्भात शिफारशी केल्या आहेत. यासंदर्भात प्रस्ताव तयार करून आज विद्या परिषदेसमोर मांडला जाणार आहे. प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी परीक्षा व मूल्यमापन मंडळ आणि अधिष्ठाता मंडळाची बैठक झाली. या बैठकीत प्राचार्य डी. जी. कणेसे यांच्या समितीने महाविद्यालय पातळीवरील परीक्षेच्या अनुषंगाने शिफारशी मांडल्या. या शिफारशींवर झालेल्या चर्चेअंती महाविद्यालयांनी परीक्षेचे संपूर्ण कामकाज न करता विद्यापीठानेच प्रश्नपत्रिका व परीक्षेचे नियोजन करावे अशी चर्चा झाली. त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा विशेष बाब म्हणून संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात याव्या, अशा शिफारशी मांडण्यात आल्या. तसेच महाविद्यालय व अधिविभागात होणार्या व्हायवा, प्रॅक्टीकल, प्रात्यक्षिकेही ऑनलाईन पध्दतीने मिटींग किंवा मोबाईल ऍपव्दारे घ्यावीत, असा प्रस्ताव पुढे आला.
आज विद्यापरिषदेसमोर ऑनलाईन परीक्षेसंदर्भात प्रस्ताव ठेवला जाणार आहे. त्यानंतर अधिकार मंडळांच्या सुचनेनुसार परीक्षेला लागणाऱया प्रश्न संच (क्वश्न बँक) तयार करण्याचे काम सुरु करण्यात येईल. परीक्षेसाठी कोणते सॉफ्टवेअर वापरायचे यासंदर्भातही आज निर्णय घेतला जाणार आहे. शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा घेण्याची पूर्ण तयारी केली आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दिलेल्या वेळेत परीक्षा घेवून, वेळेत निकाल लावण्याची विद्यापीठाची परंपरा जपण्यासाठी विद्यापीठ प्रशासन प्रयत्न करीत आहे.
विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तयारीला लागावे
विद्यापीठाकडून युध्द परीक्षेचे नियोजन सुरू आहे. 15 सप्टेंबरपासून प्रॅक्टीकल परीक्षा सुरू होतील. तर ऑक्टोबर महिन्यात अंतिम वर्षाच्या लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षेचे लवकरच वेळापत्रक जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तयारीला लागावे.
-कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर (शिवाजी विद्यापीठ)