प्राथमिक, माध्यमिक, पीयुसी विद्यार्थ्यांचे नवीन बसपास मिळविण्याकडे दुर्लक्ष
बेळगाव / प्रतिनिधी
परिवहनने गतवषी वितरित केलेल्या बसपासची मुदत दि. 31 ऑगस्ट रोजी संपल्यामुळे पदवी, डिप्लोमा आणि बीएडच्या विद्यार्थ्यांच्या बसपासचे नुतनीकरण करण्यात येत आहे. बसस्थानकातील बसपास विभागात हे काम सुरू असून विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे.
कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून शाळा-महाविद्यालये उशिराने सुरुवात होत आहेत. त्यामुळे बसपासची प्रक्रियादेखील उशिराच सुरू झाली. दरम्यान गतवषीपासून बसपासची प्रक्रिया पूर्णपणे बदलली. बसपाससाठी ऑनलाईन अर्जाची तरतूद करण्यात आली. गतवषी पदवी, डिप्लोमा आणि बीएडच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या बसपासची मुदत 31 ऑगस्ट रोजी संपली आहे. मात्र या विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षा अद्याप झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी केवळ पदवी, डिप्लोमा आणि बीएडच्या विद्यार्थ्यांना मुभा देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांच्या बसपासची मुदत दोन महिन्यांसाठी वाढवून देण्यात येत आहे. बसपास विभाग जुन्या बसपासवर तारीख बदलून देत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना जुन्या पासच्या आधारे आणखी दोन महिने प्रवास करता येणार आहे.
पदवी, डिप्लोमा आणि बीएडच्या विद्यार्थ्यांना बसपासची मुदत वाढवून दिली जात असली तरी प्राथमिक, माध्यमिक, पीयुसी व इतर विद्यार्थ्यांना नवीन पास काढावा लागणार आहे. मात्र विद्यार्थी नवीन पास काढण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने दोनवेळा मुदत वाढवून दिली होती. मात्र विद्यार्थीच नवीन पास मिळविण्यासाठी निरुत्साही असल्याचे दिसून येत आहे. जुन्या पासची मुदत 26 सप्टेंबरला संपली असून विद्यार्थ्यांचा प्रवास आता तिकीट काढूनच सुरू आहे.