प्रथम, द्वितीय वर्षाचे वर्गही ऑफलाईन
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांचे अंतिम वर्ष/सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांचे वर्ग 1 डिसेंबर 2020 पासून सुरू झाले आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून शुक्रवार दि. 15 जानेवारीपासून प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचे वर्गही नियमितपणे (ऑफलाईन) सुरू होणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे महाविद्यालयांत हजर होणाऱया प्राध्यापक, विद्यार्थ्यांना कोविड चाचणी सक्तीची नाही. मात्र, केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालयाच्या कोविड मार्गसूचीचे तसेच राज्य उच्च शिक्षण खात्याच्या मार्गसूचीचे पालन करणे अनिवार्य राहणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि अध्यापकेत्तर कर्मचाऱयांना कोविड मार्गसूचीचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. विद्यार्थ्यांना पालकांचे संमतीपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे. अलिकडेच राज्यातील पदवीपूर्वच्या बारावी आणि माध्यमिक शिक्षण विभागातील दहावीचे वर्ग नियमितपणे सुरू करण्यात आले.
तर सहावी ते नववीपर्यंतचे वर्ग विद्यागम पद्धतीने दिवसाआड सुरू करण्यात आले आहेत. उच्च शिक्षण विभागातील अंतिम वर्ष/अंतिम सेमिस्टरचे वर्गही नियमितपणे सुरू झाले आहेत. आता पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा आणि अभियांत्रिकीचे उर्वरित वर्गही शुक्रवारपासून सुरू होत आहेत.
महाविद्यालयांमध्ये सॅनिटायझेशन व इतर सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून विद्यार्थ्यांची संख्या आणि वर्गखोल्यांची उपलब्धता यांचा विचार करून सामाजिक अंतर राखून आसनव्यवस्था केली जात आहे. ऑनलाईन शिक्षणही सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत हजर होण्याची सक्ती नाही. असे विद्यार्थी ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेऊ शकतात.
विद्यार्थी, प्राध्यापकांना कोविड चाचणी सक्तीची नाही. मात्र, कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्यांना कोविड चाचणी सक्तीची आहे. वर्गखोलीत एकूण आसनव्यवस्थेच्या 50 टक्के प्रमाणात विद्यार्थ्यांसाठी आसनव्यवस्था असणार आहे. विद्यार्थ्यांना घरातून जेवण आणि पिण्याचे पाणी आणण्याची मुभा आहे.