इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंड सर्वबाद 378, रॉबिन्सनचे 4 तर मार्क वूडचे 3 बळी
वृत्तसंस्था / लंडन
29 वर्षीय डेव्हॉन कॉनवे हा पदार्पणाच्या कसोटी डावात द्विशतक झळकावणारा न्यूझीलंडचा दुसरा तर जागतिक स्तरावरील फक्त 6 वा फलंदाज ठरला. त्याच्या द्विशतकामुळे न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्वबाद 378 धावांपर्यंत मजल मारली. कॉनवेने 347 चेंडूत 22 चौकार व एका षटकारासह 200 धावांचे योगदान दिले. यापूर्वी किवीज संघातर्फे मॅथ्यू सिनक्लेयरने 1999 मध्ये विंडीजविरुद्ध असा पराक्रम गाजवला होता.
कॉनवेने प्रतिष्ठेच्या लॉर्ड्स स्टेडियमवर दुसऱया दिवशी षटकार खेचून द्विशतक साजरे केले. योगायोग म्हणजे त्याने शतक देखील षटकारानेच साजरे केले होते. शेवटचा फलंदाज नील वॅग्नरने समयोचित साथ दिल्याने कॉनवेला द्विशतक पूर्ण करता आले. कॉनवेने फाईनलेगच्या दिशेने षटकार खेचला. मात्र, द्विशतक साजरे केल्यानंतर याच धावसंख्येवर तो धावबाद झाला आणि न्यूझीलंडचा डाव 122.4 षटकात 378 धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडतर्फे ओलि रॉबिन्सनने 75 धावात 4 तर मार्क वूडने 81 धावात 3 बळी घेतले. जेम्स अँडरसनने 83 धावात 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर इंग्लंडने 2 बाद 112 अशी सुरुवात केली.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड पहिला डाव : 122.4 षटकात सर्वबाद 378. (डेव्हॉन कॉनवे 347 चेंडूत 22 चौकार, 1 षटकारासह 200, हेन्री निकोल्स 175 चेंडूत 4 चौकारांसह 61, टॉम लॅथम 23, नील वॅग्नर 21 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह नाबाद 25. ओलि रॉबिन्सन 28 षटकात 75 धावात 4 बळी, मार्क वूड 27 षटकात 3-81, जेम्स अँडरसन 2-83).
इंग्लंड पहिला डाव:43 षटकात 2 बाद 112 (रोरी बर्न्स खेळत आहे 59, जो रुट खेळत आहे 42. टीम साऊदी 1-17, काईल जेमिसन 1-29).
सौरभ गांगुलीचा 25 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत
डावखुऱया सौरभ गांगुलीने 1996 मध्ये कसोटी पदार्पणात 131 धावांची खेळी साकारली होती. तो विक्रम कॉनवेने येथे मोडीत काढला. योगायोग म्हणजे गांगुली व कॉनवे यांच्या वयात 20 वर्षांचा फरक असला तरी दोघांची जन्म तारीख मात्र एकच 8 जुलै ही आहे. कॉनवे लॉर्ड्सवर पदार्पणात शतक झळकावणारा केवळ तिसरा बिगर-इंग्लिश फलंदाज आहे. या मैदानावर, गांगुलीशिवाय ऑस्ट्रेलियन फलंदाज हॅरी ग्रॅहमने 1893 मध्ये इंग्लंडविरुद्ध 107 धावा झळकावल्या आहेत.
कसोटी पदार्पणातील डावात द्विशतक झळकावणारे फलंदाज
फलंदाज | संघ | धावा | प्रतिस्पर्धी | वर्ष | ठिकाण |
रेग फॉस्टर | इंग्लंड | 287 | ऑस्ट्रेलिया | 1903 | सिडनी |
लॉरेन्स रो | विंडीज | 214 | विंडीज | 1972 | किंग्स्टन |
ब्रेन्डॉन कुरुप्पू | श्रीलंका | 201 ना. | न्यूझीलंड | 1987 | कोलंबो |
मॅथ्यू सिनक्लेयर | न्यूझीलंड | 214 | विंडीज | 1999 | वेलिंग्टन |
जॅक्स रुडॉल्फ | द. आफ्रिका | 222 ना. | बांगलादेश | 2003 | चत्तोग्राम |
डेव्हॉन कॉनवे | न्यूझीलंड | 200 | इंग्लंड | 2021 | लॉर्ड्स |