प्रतिनिधी / मडगाव
चित्रकलेच्या माध्यमांतून गोव्याला नावलौकीक प्राप्त करून दिलेले ज्येष्ठ चित्रकार पद्मभूषण लक्ष्मण पंढरीनाथ पै यांच्यावर काल संपूर्ण शासकीय इतमामात मडगावच्या मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी यावेळी त्यांना 21 तोफांची सलामी दिली. अंत्यसंस्काराला विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई तसेच लक्ष्मण पै यांचे शिष्य उपस्थितीत होते.
मुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली
पद्मभूषण लक्ष्मण पै यांचे रविवार दि. 14 मार्च रोजी वृद्धापकाळाने वयाच्या 95व्या वर्षी दोनापावल-पणजी येथे दुःखद निधन झाले होते. बुधवारी त्यांचे पूत्र आकाश हे अमेरिकेतून गोव्यात परतले होते. काल गुरूवारी स्व. लक्ष्मण पै यांचे पार्थिव दोनापावल-पणजी येथील निवासस्थानी दुपारी 12 ते 2 वाजे पर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांचे मुळ घर मडगाव येथे असल्याने पार्थिव मडगावात पै फोंडेकर निवासस्थानी आणले गेले. या ठिकाणी संध्याकाळी 3.30 ते 4 वाजे पर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भेट देऊन त्यांना आदरांजली वाहिली.
21 तोफांची सलामी
पद्मभूषण लक्ष्मण पै यांनी चित्रकलेच्या क्षेत्रात जगभरात गोव्याला नावलौकीक प्राप्त करून दिला होता. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार असलेल्या लक्ष्मण पै यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली होती. त्या प्रमाणे, सरकारने शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला होता.
तिरंग्यात लपेटले पद्मभूषण लक्ष्मण पै यांचे पार्थिव मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशानभूमीत आणले गेले, त्यावेळी पोलिसांनीच पार्थिवाला खांद्दा दिला होता. पार्थिक स्मशानभूमीच्या आवारात आणल्यानंतर पोलिसांच्या बंड पथकाने त्यांना मानवंदना देणारी धून सादर केली. त्यानंतर 21 तोफांची सलामी दिली.
कलेच्या क्षेत्रात न भरून येणारी पोकळी निर्माण झालीय
लक्ष्मण पै हे जागतिक ख्यातीचे चित्रकार होते. त्यांनी कलेच्या माध्यमांतून गोव्याला नावलौकीक मिळवून दिला होता. त्याच्या कलेची दखल घेऊन सरकारने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण असे पद्म पुरस्कार दिले होते. अशा महान कलाकारांच्या जाण्याने कलेच्या क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी न भरून येणारी होती अशी प्रतिक्रीया विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केली. पेरीसमध्ये जाऊन त्यांनी स्वताचे असे स्थान निर्माण केले होते. गोवा कला महाविद्यलयाचे ते प्राचार्य होते. त्यांची चित्रे प्रतीकात्मक असायची. लक्ष्मण पै यांनी वयाच्या 95 मध्ये होते तरी त्यांची स्मरणशक्ती व हात मजबूत होते असे श्री. कामत म्हणाले.
लक्ष्मण पै हे गोव्याच्या कलेचे प्रतिक होते
लक्ष्मण पै यांनी जागतिक पातळीवर नावलौकीक प्राप्त केला होता. ते गोव्याच्या कलेचे प्रतिक होते. गोवा हे पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे गोव्यात सरकारने कलेच्या क्षेत्राकडे दुर्लक्ष करू नये. सरकारने आर्ट गॅलरी उभारावी यासाठी आपण विधानसभेत आवाज उठविणार असल्याची प्रतिक्रीया आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.
काल अंत्यसंस्काराला लक्ष्मण पै यांचे शिष्य श्रीधर कामत बांबोळकर, महेंद्र आल्वारीस, मडगावचे उद्योजक दत्ता नायक, उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर, अजित हेगडे तसेच पै फोंडेकर कुटुंबातील सदस्य उपस्थितीत होते. पूत्र आकाश यांनी पार्थिवाला मंत्राग्नी दिला.