प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील प्रख्यात साहित्यिक पद्मश्री मारिया अरोरा कुटो यांचे अल्प आजारानंतर शुक्रवारी निधन झाले. त्या 86 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह राज्यातील अनेक साहित्यिक तसेच राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.
हळदोणे येथे वास्तव्यास असणाऱया कुटो यांनी 1986 मध्ये ‘ग्रॅहम ग्रीन’ या इंग्रजी पुस्तकाने लेखन सुरू केले. 2014 मध्ये त्यांनी ‘फिलोमेनाज जर्नी’ हे पुस्तक लिहिले. त्यानंतर त्यांनी लिहिलेले ‘अ डॉटर्स स्टोरी’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक फारच गाजले. दरम्यानच्या काळात भारत तसेच इंग्लंडमध्येही त्यांनी अनेक इंग्रजी नियतकालिकांमधून विपूल लेखन केले.
त्यांचे पती आल्बान कुटो यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. आयएएस अधिकारी असलेले कुटो यांनी राज्यपाल जेकब यांचे सल्लागार म्हणूनही जबाबदारी पार पाडली होती.
मारिया कुटो यांनी गोवा विद्यापीठासाठीही महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्याशिवाय गत काही वर्षांपासून गोव्यात आयोजित होणाऱया डी. डी. कोसंबी विचार महोत्सवाच्या आयोजनातही त्यांचा मोठा हातभार लागला होता. 2008 मध्ये कोसंबी शताब्दी समारोह समितीवर त्या अध्यक्ष होत्या. 2010 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांना न्युमोनिया आणि अन्य संसर्ग झाल्याचे निदान करण्यात आले होते. त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू होते. शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांचे पुत्र विवेक कुटो यांनी समाजमाध्यमांवरून दिली आहे. आज दि. 15 रोजी हळदोणे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.