प्रतिनिधी /पणजी
गोव्याची लोककला-लोकवेदाचे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री विनायक खेडेकर यांनी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची सदिच्छा भेट घेतली. राज्यपालांनी त्यांच्याशी सुमारे अर्धा तास संवाद साधून गोव्याची संस्कृती, लोककला, साहित्य याविषयी माहिती जाणून घेतली.
खेडेकर हे पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ठरल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले. गोमंतकीय तसेच भारतीय लोकसंस्कृतीचे जतन, संवर्धन करण्याबाबत खेडेकर यांनी यांनी केलेल्या संशोधनात्मक कार्याची माहिती जाणून घेतली. तसेच सध्या खेडेकर यांचे काय काय उपक्रम सुरु आहेत, याबातही जाणून घेतले.
विनायक खेडेकर यांनी आपली ’गोवा लँड, लाइफ अँड लेगसी’ आणि ’इको कल्चर, गोवा पॅराडिगम’ ही दोन पुस्तके राज्यपालांना भेट दिली. यावेळी राज्यपालांना गोव्याच्या संस्कृतीबद्दल बरीच उत्सुकता असून त्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यात त्यांना स्वारस्य असल्याचे दिसून आले. राज्यपालांनी मनमोकळेपणाने खेडेकर यांना काही प्रश्न केले, काही शंका उपस्थित केल्यामुळे खेडेकर यांनी गोव्याची खरी आणि अधिकृत संस्कृती, याबाबत संक्षिप्तपणे माहीती दिली. गोव्याच्या इतिहासाबाबतही राज्यपालांनी स्वारस्य दाखविले.