दिल्लीत पुरस्कार वितरण – अरुण जेटली, सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्मविभूषण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राष्ट्रपती भवनात सोमवारी पद्म पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. याप्रसंगी राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनेक मान्यवर आणि सेलिब्रिटींना या पुरस्कारांनी सन्मानित केले. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह निवडक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. दरवषी प्रजासत्ताक दिनी या पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली जाते.
राष्ट्रपती भवनातील सोहळय़ात बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत, गायक अदनान सामी आणि बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू यांच्यासह विजेत्यांचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबीयांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अरुण जेटली यांचा पुरस्कार त्यांच्या पत्नी संगीता जेटली यांनी तर सुषमा स्वराज यांचा पुरस्कार त्यांच्या कन्या बन्सुरी स्वराज यांनी स्वीकारला. शास्त्रीय गायक पंडित चन्नूलाल मिश्रा यांना पद्मविभूषण, गायक अदनान सामी यांना पद्मश्री, माजी आयसीएमआर मुख्य वैज्ञानिक डॉ. रमण गंगाखेडकर यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाले.