प्रतिनिधी/ सातारा
मुंबई महामार्गावर पनवेल नजीक झालेल्या बस-ट्रेलर यांच्यात झालेल्या अपघात प्रकरणी पनवेल पोलिसांनी बस चालकास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपल्या चुकीमुळे अपघात झाल्याची कबुली दिली. दरम्यान, पनवेल पोलिसांनी बसचालक जगन्नाथ राऊत यांना अटक केली आहे. अपघातामध्ये सातारा जिह्यातील कोरेगाव येथील एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता.
याबाबत मिळालेली माहिती अशी, दि. 26 रोजी वडूज-मुंबई बस आणि ट्रेलरचा पनवेल द्रुतगती महामार्गावर अपघात होऊन त्यामध्ये कोरेगाव येथील गणेश कदम या प्रवासाचा मृत्यू झाला होता तर अन्य आठजण जखमी झाले होते. बसचालक जगन्नाथ राऊत यांनी या अपघाताबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अज्ञात ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बडगुजर यांनी या अपघात प्रकरणाचा वेगाने तपास करून ट्रेलर चालकास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता बसचालकाने चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केल्यामुळे हा अपघात झाल्याचे तपासाअंती समोर आले. बसचालक जगन्नाथ राऊत यांनी दिलेली तक्रार खोटी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जगन्नाथ राऊत यांना पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली आहे. या अपघातात जखमी झालेल्या अन्य आठ प्रवाशांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.