प्रतिनिधी / सुधाकर काशीद
शनिवार 4 सप्टेंबर रोजी पहाटे पन्हाळा येथील डॉ. राजा होळकर यांच्या बंगल्याच्या आवारात बिबट्याचा वावर आढळला. बिबट्याला बंगल्याच्या व्हरांड्यातील कुत्र्याची शिकार अपेक्षित होती. अंगण गेट पार करून बिबटया बंगल्याच्या व्हरांड्यात पोहोचलाही होता. मात्र कुत्र्याची शिकार झाली नाही.
तबक बाग मार्गावर असलेल्या या बंगल्याच्या आवारात बिबट्याचा नेहमी वावर असतो. पण बिबट्याला पकडा, त्याला अन्यत्र सोडा अशी मागणी होळकर परिवाराने केलेली नाही. बिबट्या त्याच्या भक्षासाठी फिरत रहाणार. बंगल्याच्या आवारातील कुत्र्याची शिकार करण्यासाठी तो येत रहाणार. हे आपण मान्यच करावे लागणार अशी होळकर परिवाराची निसर्गपूरक भुमिका आहे. या निमित्ताने प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासावर मानवी अतिक्रमण झाल्याने जंगली प्राणी मानवी वस्तीकडे वळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.