प्रतिनिधी / पन्हाळा
कोविड 19 या साथीच्या अनुषंगाने वाघबीळ, पन्हाळा येथील तालुकास्तरीय कोविड सेंटरला पी.बी पाटील उपायुक्त पुणे यांनी आज भेट दिली.यावेळी त्यांनी संपुर्ण तालुक्याचा आढावा घेत कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
सदर भेटीवेळी त्यांनी येथील फिवर ट्रिटमेंट क्लिनिक येथे भेट देऊन विविध नोंदवह्या व आंतररुग्ण पत्रिकांची तपासणी केली .तसेच स्वँब संकलन केंद्रास भेट देऊन दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला. तालुक्यातील ग्रामस्तरीय खाजगीकरण कक्ष ,गृह अलगीकरण कक्ष,तालुकास्तरीय अलगीकरण कक्षाबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल कवठेकर यांच्याकडून माहिती घेतली. सदर कक्षा मधील व्याधीग्रस्त रुग्णांवर व डिस्चार्ज दिलेल्या बाधित रुग्णांवर दैनंदिन विशेष लक्ष देणे बाबत सूचना दिल्या. तसेच गावपातळीवर राबविण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत गटविकास अधिकारी तुलशीदास शिंदे यांच्याकडून आढावा घेऊन लोकांचे सोशल डिस्टंसिंग,फेसमास्क व सँनीटायझर वापर ,वारंवार हात धुणे आदी बाबत व्यापक जनजागृती करणे बाबत सूचना दिल्या.
उपायुक्त पी.बी.पाटील यांनी पन्हाळा तालुक्यातील एकंदरीत कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले .सदर भेटीवेळी गटविकास अधिकारी तुलशीदास शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल कवठेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री एस एल सावंत, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमृता गुरव, विस्ताराधिकारी एस टी पांडव ,एम.बी.चौगुले उपस्थित होते.