पन्हाळा / प्रतिनिधी
पन्हाळ्यातील लता मंगेशकर बंगल्याच्या मागील बाजूस असणाऱ्या तटबंदी खालच्या परिसरात बिबट्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी पन्हाळ्यासह परिसरात बिबट्याची डरकाळी फुटली आहे. बिबट्यांच्या दर्शनामुळे भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
पन्हाळगडाच्या दक्षिणेस विस्तीर्ण अशा माळ आहे.याठिकाणी गडाची विशाल तटबंदी असुन तटबंदीच्या खाली पन्हाळा ते निकमवाडी गावादरम्यान दगडी शिळासह मोठ्या प्रमाणात जंगल क्षेत्र आढळून येते.याठिकाणी गव्यांचे वास्तव्य काही नवे नाही. मात्र आज चक्क निकमवाडीच्या वरील बाजुस असणाऱ्या जंगलामध्ये बिबट्या आढळून आल्याने शेतकरी वर्गासह ग्रामस्थांचे धाबे दणाणले आहे.
आज शुक्रवारी सायंकाळी पन्हाळ्यातील उत्तम दळवी हे लता मंगेशकर बंगला परिसरातील माळावर फिरायला गेले होते.साधरणत: सायंकाळी साडे सहा ते सात च्या दरम्यान या बिबट्याचे दर्शन झाले.दळवी यांनी तटबंदीच्या खालील बाजुस जंगलात नजर गेली असता त्यांना एका दगडावर सदरचा बिबट्या विश्रांती घेताना दिसुन आला. त्यांनी लगेच प्राणीमित्र धिरज कुराडे यांना याची माहिती दिली.त्यानंतर धिरज कुराडे यांनी घटनास्थळी धाव घेत. या बिबट्याला आपल्या कॅमेरात कैद केले. बिबट्या आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने बिबट्या आला,बिबट्या आला असा एकच परिरात गोंधळ उडाला.
हा बिबट्या साधरणपणे सहा ते साडेसहा फुट लांब व चार ते साडेचार फुट उंच असुन पुर्ण वाढ झालेली असल्याचे धिरज कुराडे यांनी सांगितले.दरम्यान,पन्हाळगडाचा मुख्य रस्ता खचल्याने तीनदरवाजातुन निकमवाडी मार्गे वाहतुक सुरु असल्याने या रस्त्यावर वर्दळ वाढली आहे.पण बिबट्यांचे दर्शनाने वाहनधारकांसह नागरिकांच्यात भिती निर्माण झाली आहे.काल गुरुवारी इंजोळे परिसरात वाघसदृश्य प्राण्यांचे दर्शन झाल्याचे समोर आले होते. पण इंजोळे ग्रामस्थांनी हा बिबट्या आणि इंजोळे परिसरातील वाघसदुर्श प्राणी वेगवेगळे आहेत. कारण या बिबट्यापेक्षा वाघसदुर्श प्राणी मोठा असल्याचे इंजोळे येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे. त्यामुळे परिसरात वाघाचे देखील संचार होत आहे काय याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
परिसरात सायंकाळ नंतर अघोषित कर्फ्यु पुकारण्यात आल्याचे दिसुन येत आहे. एकूणच पन्हाळा परिसरातील बिबट्याच्या डरकाळीमुळे सापळा रचून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.