वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये राजदच्या छायेतून बाहेर पडण्याचा निर्धार आता काँग्रेसने केला असून त्यादृष्टीने पावलेही टाकण्यास प्रारंभ केला आहे. कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये सामील झाल्यावर आता 5 महिन्यांनी तुरुंगातून बाहेर पडलेले माजी खासदार पप्पू यादव यांची पक्षात एंट्री होऊ शकते. पप्पू यादव लवकरच राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. बिहारमधील पोटनिवडणुकीकरता पप्पू यादव यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे.
बिहारमधील महाआघाडीत सर्वकाही सुरळीत नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दोन जागांवर होणाऱया पोटनिवडणुकीवरून काँगेस आणि राजद यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. राजदकडून उमेदवार जाहीर करण्यात आल्यावर काँग्रेसही उमेदवार उतरविण्याच्या तयारीत आहे. राजदसोबतचे बिघडते संबंध पाहता काँग्रेस बिहारमध्ये राजकीय बळ वाढविण्याच्या दृष्टीने पावले उचलत आहे. पप्पू यादवांमुळे काँग्रेसला राज्यात यादव समुदायाशी संबंधित नेता गवसणार आहे. तर कन्हैया कुमारच्या पक्षप्रवेशामुळे भूमिहारांमध्ये प्रभाव निर्माण करण्याची अपेक्षा काँग्रेसला वाटत आहे.
पप्पू यादव अन् काँग्रेस
पप्पू यादव यांच्या पत्नी रंजीत रंजन बिहारच्या सुपौल मतदारसंघाच्या काँग्रेस खासदार राहिल्या आहेत. सद्यकाळात त्या काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव आहेत. काँग्रेसने बिहारमध्ये राजदपासून वेगळे होत स्वतःच्या विचारसरणीसह नव्या बिहारच्या निर्मितीची भूमिका घ्यावी असे पप्पू यादव यांनी म्हटले आहे.