ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशाच्या परकीय चलनसाठय़ात सातत्याने घट होताना दिसत आहे. 7 जानेवारीला संपलेल्या आठवडय़ात परकीय चलनामध्ये 87.8 कोटी डॉलर्सची घट झाली आहे. परकीय चलनामधून होणारी कमाई मंदावल्याने ही घट होत असल्याचे सांगण्यात येत असून, यामुळे सरकारची चिंता वाढली आहे.
आरबीआयने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात सध्या 632.736 अब्ज डॉलर एवढे परकीय चलन शिल्लक राहिले आहे. 7 जानेवारी 2022 ला संपलेल्या आठवडय़ात परकीय चलनामध्ये 87.8 कोटी डॉलर्सची घट झाली. यापूर्वी 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या आठवडय़ामध्ये परकीय चलनात 1.466 अब्ज डॉलर्सची घट होऊन ते 633.614 अब्ज डॉलर्सवर आले होते. तर 24 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवडय़ात परकीय चलनामध्ये 58.7 कोटी डॉलरर्सची घट झाली होती. त्यावेळी परकीय चलन 635.08 अब्ज डॉलर्सपर्यंत आलं होतं. परकीय चलनात सातत्याने होणारी ही घट सरकारची चिंता वाढवणारी आहे.
दरम्यान, देशाच्या सरकारी तिजोरीमधील सोन्याच्या एकूण साठय़ाचं मूल्यही 36 कोटी डॉलर्सने कमी झाले आहे. हे मूल्य आता 39.044 डॉलर एवढं आहे.