मालवण पालिकेची कारवाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरील भाजी विक्रीला बंदी : जिल्हय़ातील पहिलीच घटना
प्रतिनिधी / मालवण:
शहरात परजिल्हय़ातील भाजी व फळ विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही मालवण मार्केटमध्ये बेकायदेशीरपणे परजिल्हय़ातील भाजी विक्री केल्याप्रकरणी पालिका प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बशीर शरपुद्दीन अथणीकर या भाजी विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला. पालिकेच्या आरोग्य विभागाने मंगळवारी दुपारी अथणीकर याच्या गोडाऊनमधून परजिल्हय़ातील भाजी जप्त केली होती. अथणीकरविरुद्ध भादंवी कलम 188 आणि आपत्ती व्यवस्थापन 2005 चे कलम 51 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय भारत फारणे करत आहेत. जिल्हय़ात अशा प्रकारचा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे.
पालिकेने परजिल्हय़ातील भाजी व फळ विक्रीवर शनिवारपासून बंदी घातल्याच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांत शिल्लक माल विक्री करण्याचे निर्देशही दिले आहेत. यामुळे मालवण मार्केटमध्ये परजिल्हय़ातील भाजी खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळे काही विक्रेत्यांनी डबल दराने भाजी विक्री केली होती. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र, सोमवारपासून परजिल्हय़ातील भाजी व फळ विक्रीवर पूर्णपणे बंदी करून त्याची कडक अंमलबजावणी पालिका प्रशासनाने केली होती.
पालिकेने जबाबदारी पेलली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरसेवकांची तातडीची बैठक शुक्रवारी नगराध्यक्ष महेश कांदळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात नगर परिषद हद्दीत जिल्हय़ाबाहेरून येणाऱया भाजी व फळ विक्रीवर 18 एप्रिलपासून बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरात भाजी, फळ विक्रेत्यांकडे शिल्लक असलेली भाजी व फळांची विक्री करण्यासाठी 19 एप्रिलपर्यंत सूट देण्यात आली होती. मात्र, स्थानिक तसेच जिल्हय़ातील भाजी, फळ विक्रीसाठी सूट देण्यात आली आहे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. पालिकेने त्यासाठी अधिकाऱयांची नियुक्ती करून कडक कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार दुसऱया दिवशीच ही कारवाई करण्यात आली.
गोडाऊनमधून भाजीपाला जप्त
अथणीकरच्या गोडाऊनमध्ये भाजी विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यांनतर पालिकेच्या पथकाने धडक देत भाजी जप्त केली. कारवाईत पालिकेचे अधिकारी सुधाकर पाटकर, जयसिंग गावित, आरोग्य निरीक्षक विजय खरात, मुकादम रमेश कोकरे, हेमंत वायंगणकर, गौरव सोनवडेकर, मंदार चव्हाण हे सहभागी झाले होते. याबाबत गावित यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
खरेदीदारांवर कारवाई करा!
परजिल्हय़ातील भाजी विक्रीला बंदी असताना काही सुशिक्षित नागरिक संबंधित भाजी विक्रेत्याच्या गोडाऊनमध्ये जाऊन भाजी खरेदी करत असल्याचे व्हिडिओ शूटिंग करण्यात आले आहे. त्यामुळे बंदी असणाऱयाकडून भाजी खरेदी करण्यासाठी गेलेल्या संबंधितांवरही कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.