शहर परिसरातील जनजीवन विस्कळीत : देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची धावपळ : पिके वाया जाण्याची भीती
प्रतिनिधी/ बेळगाव
परतीच्या पावसाने मंगळवारी दमदार हजेरी लावली. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दुपारपासूनच पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. सखल भागामध्ये पाणी साचून होते. तर अनेक ठिकाणी गटारी तुडुंब भरून पाणी रस्त्यावरून वाहत होते. बाजारपेठेतील व्यापाऱयांची चांगलीच तारांबळ उडाली. या पावसामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला होता.
मंगळवारी दुपारीच दमदार पावसाला सुरूवात झाली. तसेच अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले. त्यानंतर काही वेळ पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र पुन्हा सायंकाळी पावसाला दमदार सुरूवात झाली. रात्री आठच्या सुमारालाही पावसाला सुरूवात झाल्यामुळे दसरोत्सवानिमित्त देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. शहरासह उपनगरांमध्ये हा दमदार पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.
गेल्या दोन दिवसांपासून उष्मा वाढला होता. त्यामुळे आकाशात ढग जमून सोमवारी पाऊस झाला होता. त्यानंतर मंगळवारीही दुपारीच दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे साऱयांचीच तारांबळ उडाली. दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती भागासह पूर्व भागामध्ये अचानकपणे दमदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे दुचाकीस्वार, फेरीवाले, भाजी विपेते यांची तारांबळ उडाली.
सुगीमध्ये पावसाचा व्यत्यय
परतीचा पाऊस कधी जाणार याकडेच साऱयांचे लक्ष लागले असताना दररोजच ढगाळ वातावरण आणि पावसाचे आगमन होत आहे. यामुळे सुगीमध्ये व्यत्यय निर्माण होत आहे. ऑक्टोबर अर्ध्यावर आला असताना दमदार पाऊस पडत असल्यामुळे हातातोंडाला आलेली पिके वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. दसरोत्सव सुरू असल्यामुळे मंदिरांमध्ये काही प्रमाणात भाविकांची गर्दी जमत आहे. यातच पाऊस येत असल्यामुळे भाविकांनाही पावसाचा फटका बसत आहे.
बाजारपेठेला पावसाचा फटका
मंगळवारी पडलेल्या दमदार पावसामुळे शहरामध्ये काही ठिकाणी पाणी साचून होते. दुपारी दीडनंतर पुन्हा साडेतीनच्या सुमारास पावसाचे आगमन झाले. त्यानंतर सायंकाळीही पावसाची रिपरिप सुरूच होती. या पावसामुळे हवेमध्ये काही प्रमाणात गारवा निर्माण झाला होता. या पावसाचा फटका बेळगाव बाजारपेठेला बसला आहे. सध्या दसरोत्सवाच्या खरेदीसाठी नागरिक बाजारपेठेत येत आहेत. मात्र पावसामुळे ते कंटाळले आहेत.