विजांच्या गडगडाटासह मुसळधार
प्रतिनिधी/ पणजी
परतीच्या पावसाने सोमवारी राज्यभरात जोरदार दणका दिला. विजांच्या गडगडाटासाह सायंकाळी उशिरा सुरू झालेला पाऊस मध्यरात्रीपर्यंत चालूच होता. मध्यरात्री जोर वाढला व पहाटे पावसाने विश्रांती घेतली. मान्सूनोत्तर पाऊसही यावर्षी नवा विक्रम प्रस्थापित करण्याच्या मार्गावर आहे.
सोमवारी रात्री पडलेल्या पावसाने सर्वांची दाणादाण उडविली. विशेषतः पणजीत सुमारे पावणेदोन इंच एवढी पावसाची नोंद झाली. सांखळीत 1 इंच, म्हापसा, पेडणे, फेंडा, मडगाव, मुरगाव, सांगे इत्यादी ठिकाणी अर्धा इंच पाऊस झाला. केपेमध्ये पाऊण इंच पावसाची नेंद झाली. दिवसभर उकाडय़ाने हैराण झालेल्या जनतेला पावसाने दिलासा दिला, खरा परंतु परतीचा हा पाऊस अतिआक्रमक होता.
पेडणेमध्ये मान्सूनोत्तर पाऊस 12 इंचावर पोहोचला. वाळपईतही 12 इंच झाले. सांखळीत 11 इंच, फोंडय़ात 10.50 इंच, काणकोणमध्ये 10 इंच व जुने गोवे येथे सुमारे 9 इंच एवढी पावसाची नोंद आतापर्यंत झालेली आहे. आज बुधवारपासून काही दिवस पाऊस विश्रांती घेईल आणि दिवाळीपूर्वीच पुनरागमन करील असा अंदाज आहे.