- रुपाली चाकणकर यांचे चित्रा वाघ यांना जोरदार प्रत्युत्तर
ऑनलाईन टीम / मुंबई :
अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यानंतर भाजप ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत आहे. त्यातच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटे काढले. त्यावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर देऊन टोला लगावला आहे.
शेवटी अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. पण प्रश्न अजूनही उपस्थित होत आहे की नवीन वसुली मंत्री कोण असणार? पदावरील मंत्र्यांचा चेहरा बदलल्याने महाविकास आघाडीच्या सरकारचा भ्रष्ट हेतू बदलणार नाही. असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले होते. यावरून रुपाली चाकणकर यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
‘चित्राताईंचा नवरा स्वतः भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर रीतसर गुन्हे दाखल आहेत आणि ताई विचारत आहेत नवीन वसुली मंत्री कोण? अहो ताई, भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की अंगलट आले की परत पवार साहेब माझ्या वडिलांसारखे आहेत हे म्हणण्याची वेळ येईल. थोडा धीर धरा ठेवा, सत्य समोर येईल’, असे प्रत्युत्तर रुपाली चाकणकर यांनी दिले आहे.
दरम्यान, किशोर वाघ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं दाखल केलेला गुन्हा 2016 साली भाजप सत्तेत असताना दाखल झाला होता. त्याची चौकशी आज गुन्हा दाखल होण्यापर्यंत येऊन पोहोचली होती, अशी टीका देखील रुपाली चाकणकर यांनी याआधी केली होती.