ऑनलाईन टीम / ताशकंद :
अर्थव्यवस्थेचा रुतलेला गाडा हाकण्यासाठी उज्बेकिस्तानने पर्यटनाला परवानगी दिली आहे. पर्यटनाला परवानगी देत असतानाच या देशाने ‘सुरक्षित यात्रा गॅरंटी’ हे अभियान सुरू केले आहे. या अभियाना अंतर्गत जर परदेशी पर्यटकांना देशात कोरोनाची लागण झाली तर त्याला 3 हजार डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार साधारणपणे सव्वा दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
उज्बेकिस्तानने पर्यटनाला परवानगी दिली असली तरीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या दृष्टीने नवे नियम लागू केले आहेत. त्यानुसार विदेशी पर्यटक स्थानिक गाईडसोबतच फिरतील. तसेच त्यांच्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये स्वच्छतेचे आणि सोशल डिस्टनचे नियम पाळले जातील.
जपान, दक्षिण कोरिया, चीन आणि इज्राइल या देशातील नागरिकांना पर्यटनासाठी उज्बेकिस्तानमध्ये जाता येणार आहे. उज्बेकिस्तानचे राष्ट्रपती शवकात मिर्जीयोयेव यांनी यांसर्भात निर्णय घेतला आहे.