इंग्लंडच्या डॉ. केविन यांनी दिली जिल्हा आपत्ती व्यवस्थापनला भेट; कोल्हापूरच्या अभिनव पध्दतीने झाले प्रभावित
कोल्हापूर प्रवीण देसाई
कोल्हापूर जिल्हयाच्या आपत्ती व्यवस्थापनाची किर्ती सातासमुद्रापार पसरली आहे. परदेशी पाहुण्यांनाही याची भुरळ पडली आहे. त्यामुळे थेट इंग्लड येथील टीसैड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. केवीन यांनी नुकतीच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देऊन आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेतले. त्यामुळे येथील आपत्ती व्यवस्थापनच्या अभिनव पध्दतीचा समावेश ट्रीसैड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमात झाल्यास नवल वाटायला नको.
इंग्लंड च्या टीसैड युनिव्हर्सिटी मध्ये MSc in Disaster Management हा अभ्याक्रम सुरु होत आहे. कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापनातील अभिनव पध्दतीचा आवाज सातासमुद्रापार घुमला आहे. याची भुरळ डॉ. केविन यांनाही पडली आहे. त्यामुळे यासंदर्भातील सखोल माहिती घेण्यासाठी त्यांनी डॉ. केविन यांनी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट दिली. या ठिकाणी अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव शंकरराव जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्याशी चर्चा केली.
कोल्हापूरची विशेष असलेली समुदायस्थित आपत्ती व्यवस्थापनाची पध्दत, आपत्ती व्यवस्थापनाचे जवान व स्वयंसेवकांचे झोकून देऊन सुरु असणारे कार्य, कोणत्याही आपत्तीचा सामोरे जाण्यासाठी असलेली आपत्ती व्यवस्थापनाची पद्धती, आपत्ती व्यवस्थापनची 24 तास सुरु असलेली कंट्रोल रुम, येथून संदेशाची होणारी देवाण-घेवाण, महापूरासह कोणत्याही आपत्तीची माहिती गावागावात व शहरातील गल्लीबोळातील नागरिकांना समजावी यासाठी उभारण्यात आलेली ‘सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली’ याशिवाय महापूरासह वर्षभर कोणत्याही आपत्तीला सज्ज असणारी अत्याधुनिक यंत्रणा आदींबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संकपाळ यांनी विस्तृत माहिती दिली.
डॉ. केविन यांनी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सुरु असलेल्या कामाचे कौतुक केले. येथील सुमदायस्थित आपत्ती व्यवस्थापन पध्दतीवर ते अधिक प्रभावित झाले आहेत. आपत्ती व्यवस्थापनच्या जवानांसह स्वयंसेवकांमधील स्फूर्ती व उत्साह वाखाणण्याजोगा असल्याचे त्यांनी सांगितले. टीसैड युनिव्हर्सिटीमध्ये सुरु होणार्या आपत्ती व्यवस्थापनाचा अभ्यासक्रमात कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या पध्दतीचा नक्कीच उपयोग होईल, असेही त्यांनी सांगितले.
सन 2019 टीसैड युनिव्हर्सिटीच्या तज्ञांनी कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापन विभागास भेट दिली होती. यानंतर पुन्हा या युनिव्हर्सिटीचे डॉ. केविन यांनी भेट देऊन माहिती घेतले. यावरुन कोल्हापूरची आपत्ती व्यवस्थापनची पध्दती खरोखरच अभ्यासू व अनुकरणीय असल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ. केविन यांची जवानांसोबत महापूराच्या स्पॉटला भेट डॉ. केविन यांनी आपत्ती व्यवस्थापनच्या जवानांसोबत बलेरो गाडीच्या हौद्यात उभे राहून शहरासह शहरालगतच्या महापूराच्या स्पॉटची पाहणी केली. यावेळी त्यांनी या जवानांसोबत चर्चा करुन माहिती घेतली. जीव धोक्यात घालून काम करणार्या या जवानांचे त्यांना विशेष अप्रुप वाटले.
आपत्ती व्यवस्थापनामध्ये कोल्हापूर जिल्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर मार्गदर्शक ठरत आहे. हे अभिमानास्पद आहे. डॉ. केविन यांनी कोल्हापूरात येऊन आपत्ती व्यवस्थापनच्या कामासह पध्दतीबद्दल विस्तृत माहिती घेतली. त्यांनी येथील कामाच्या कौतुक करुन ते अनुकरणीय असल्याचे सांगितले.
–प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी