परप्रांतीय मजुरांचे पुरावे ठरले अडचण : गोवेकरांनाच गोव्याबाहेर पाठवायचे कसे
प्रतिनिधी / पणजी
परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याची सरकारने तयारी केली खरी मात्र या परराज्यातील मजुरांपाशी आधारकार्ड, निवडणूक कार्ड गोव्याचे आहे. त्यामुळे या गोयकारांना बाहेर कसे पाठवायचे हा मोठा मुद्दा अधिकाऱयांसमोर आहे.
गोव्यातील मजुरांना परत गावी पाठविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले असता तब्बल 71 हजारजणांनी अर्ज केले आहेत.
गोवेकरांनाच गोव्याबाहेर कसे पाठवायचे
गोव्यात गोयकाराला स्वतःचे कागदोपत्री पुरावे तयार करण्यासाठी खस्ता खाव्या लागतात. मात्र बिगर गोमंतकीय गोव्यात येऊन रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड आरामात तयार करून घेतात. अधिकाऱयाला गाठायचे, मलिदा चोळायचा, राजकीय नेत्याच्या ‘वोट बँक’ला आधार द्यायचा आणि आरामात गोंयकार बनायचे असा हा प्रकार सुरु असून आता तिच मोठी समस्या बनली आहे. गोवेकरांनाच बाहेर कसे पाठविणार, असा प्रश्न अधिकाऱयांसमोर निर्माण झाला आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, बिहार, उत्तरप्रदेश, राजस्थान, काश्मिर व अन्य राज्यांतील अनेक नागरिक कागदोपत्री पुरावे गोळा करून गेंयकार बनले आहेत. आता त्यांनाच म्हणजे गोवेकरांनाच गोव्याबाहेर कसे पाठवायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामपंचायती, नगरपालिका, सरकारी कार्यालये यांचा आधार घेऊन राजकीय नेत्यानी बिगर गोमंतकीयांना गोयकार बनविले आहे. मात्र आता कोरोनाच्या भीतीपोटी आपल्या मूळ गावी जायची तयारी केली. त्यावेळी हेच कागदोपत्री पुरावे या परप्रांतियांसाठी अडचण ठरले आहेत. 71 हजार मजुरांनी गावची वाट धरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पंचायती, उपजिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नोंद केली आहे. मात्र त्यांचे डॉक्युमेंट पाहताच हे गोंयकार असल्याचे स्पष्ट झाले.
मतदानासाठी जातात मूळ गावी
गोव्याचे नागरिक बनलेले हे परप्रांतीय मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या गावीही जातात. बरेच परप्रांतीय शेजारील राज्यातील निवडणुकीवेळी बसगाडय़ा भरून कर्नाटक, महाराष्ट्रात जातात. कर्नाटकातील राजकीय नेते गाडय़ा पाठवून घेऊन जातात. हे बरेच परप्रांतीय मजूर गोव्यासह आपल्या मूळ राज्यातही मतदानाचा हक्क बजावतात. आता या परप्रांतियांना गावाची ओढ लागली आहे. पण गोव्याची रहिवासी कागदपत्रे त्यांच्यासाठी अडचणीची ठरली आहेत. यामुळे गोव्याच्या अधिकाऱयांचेही पितळ उघडे पडले आहे. तूर्त या सर्वांना परप्रांतीय ठरवून त्यांच्या घरी त्यांना कसे पाठवायचे ही समस्या आहेच.