उचगाव : उचगाव येथील श्रीमंत परमहंस गुप्तानंद महाराजांची 69 वी पुण्यतिथी येथील मठामध्ये शनिवार दि. 17 ते सोमवार दि. 19 पर्यंत साजरी करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणानेच पुण्यतिथी साजरी करण्यात येणार असल्याची माहिती उत्सव कमिटीने दिली आहे.
शनिवारी घटस्थापनेदिवशी रात्री बसुर्ते गावातील मठामधून गुप्तानंद महाराजांचा ध्वज सवाद्य उचगावमधील मठामध्ये आणण्यात येणार आहे. रविवार दि. 18 रोजी पहाटे ध्वजारोहण होऊन उत्सवाला प्रारंभ होईल. उत्सव काळात मठामध्ये पूजा, आरती हे सर्व कार्यक्रम यावर्षी साधेपणानेच, सुरक्षित अंतर ठेवून, सॅनिटायझराचा वापर आणि योग्य ती खबरदारी घेत पार पडणार आहे. रविवारी उत्सवाचा मुख्य दिवस असणार आहे. रात्रभर जागर कार्यक्रम होणार आहे. सोमवारी दुपारी महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे. मात्र, कोरोनामुळे भाविक भक्तांनी खबरदारी घेऊनच सहकार्य करण्याचे आवाहन शंकर गिरी व अरुण जाधव यांनी केले आहे.