शेती आटपून येणार ट्रॉलर्सवर काम करण्यासाठी गोव्यात : मासेमारीत रोजगाराची संधी असूनही गोवेकरांचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील मच्छीमार व्यवसाय प्रत्यक्षात जोदारपणे सुरू होण्यास आणखी 15 दिवस लागण्याची शक्यता आहे. पुढील 15 दिवसात राज्यात पाच राज्यातून सुमारे सहा ते सात हजार कामगार गोव्यात येणार आहेत. त्यांच्या अभावी राज्यातील बहुतांश ट्रॉलर अद्याप समुद्रात जाऊ शकलेले नाहीत. राज्यातील मच्छीमारीचा हंगाम 1 ऑगस्टपासून सुरू झाला असला तरी बहुतांश ट्रॉलर हे धक्क्यावरच उभे आहेत.
गोमंतकीय युवा ट्रॉलरवर जात नाही
ट्रॉलरांवर काम करण्यासाठी व जाळय़ात मासे पकडून आणण्यासाठी लागणारा 100 टक्के कामगारवर्ग हा पूर्वोत्तर राज्यांतून येणारा आहे. गोव्यात ट्रॉलरवर जाण्यासाठी गोव्यातील कामगार तयार होत नाहीत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात रोजगार संधी असून देखील गोमतंकीय युवावर्ग या व्यवसायाकडे ढुंकूनही पाहण्यास तयार नाही. परिणामी गोमतंकीयांचे हितरक्षण करण्यासाठी नारा लगावणाऱया राजकीय पक्षांचा इथे त्यांच्या नाकावर टिच्चून गोमंतकीयच पराभव करीत आहेत.
गोमंतकीय करतात केवळ घाऊक विक्री
ट्रॉलरमधून आणलेली मासळी बाहेर काढून धक्क्यावर पोहोचविण्यासाठी देखील परराज्यातील कामगारांची आवश्यकता पडलेली आहे. गोमंतकीय हे केवळ ट्रॉलरचे मालक आणि घाऊक मासळी विक्री करण्यासाठी पुढे असतात. प्रत्यक्षात काम करण्यासाठी गोमंतकीय तयार होत नाहीत. यातून पाच ते सात हजार रोजगार हा बिहार, पश्चिम बंगाल, ओडीसा, झाडखंड तसेच केरळ आणि कर्नाटकातून येणाऱया कामगारांना प्राप्त होतो.
पुढील आठवडय़ात येणार हजारो कामगार
सध्या हे कामगार आपापल्या राज्यांमध्ये शेती लागवड करण्यात गुंतलेले आहेत. पुढील आठवडय़ात ही लागवड संपुष्टात आल्यानंतर ते मोठय़ा संख्येने गोव्याकडे सरकणार आहेत. त्यासाठी अख्ख्या रेल्वेगाडीचे देखील बुकींग केले जाते. पुढील 15 दिवसात वरील राज्यातून येणाऱया कामगारांच्या रांगा आपल्याला रेल्वे स्टेशनच्या बाहेर पहावयास मिळणार आहेत.
गोमंतकीय तरुण बेकार राहणे करतात पसंत
गोव्याकडे रोजगार संधी उपलब्ध असून देखील या कामाकडे तिरस्कार दृष्टीने पाहणारे गोमंतकीय बेकार रहाणे पसंत करतात. परंतु हा व्यवसाय किंवा या संदर्भातील कामे करण्यास मुळीच राजी होत नाहीत. मासे हवेत, पण काम नको या द्विद वाक्यामुळे आता गोमंतकीय सात हजार नोकऱयांना मुकणार आहेत. ट्रॉलरवर जाऊन मासळी पकडण्याचे काम हे प्रतिष्ठेच्या आड येते त्यातून काम असून देखील बेकार रहाणे हे अलिकडच्या काळात गोमंतकीय युवक प्राधान्याने करीत असल्याचे दिसून येते.