म्हाप्रळमध्ये चालकासह 4 प्रवासी जखमी
प्रतिनिधी/ मंडणगड
परळ येथून दापोलीकडे परतीचा प्रवास करणाऱया परळ-दापोली एस.टी. बस रविवारी पहाटे 5 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर म्हाप्रळ (रोहिदासवाडी) या ठिकाणी उलटून झालेल्या अपघातात चालकासह 4 प्रवासी जखमी झाले. समोरुन येणाऱया चारचाकी वाहनाने हुलकावणी दिल्याने गाडी डाव्या बाजूला रस्त्यालगत उलटून हा अपघात घडला.
चालक प्रभाकर माधवराव घुगे (31) यांनी मंडणगड पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीतील माहितीनुसार, ते परळ-दापोली गाडीने परळ येथून रात्री 11 वाजता मार्गस्थ झाले. महामार्गावर प्रवास करीत असताना समोरुन येणाऱया चारचाकी वाहनाने हुलकावणी दिल्याने घुगे यांनीही गाडीला ब्रेक मारला आणि गाडी डाव्या बाजूला रस्त्यालगत कलंडली. यावेळी गाडीत एकूण 23 प्रवासी प्रवास करीत होते. या अपघातात चालकासह 4 प्रवासी जखमी झाले. जखमीवर मंडणगड येथे प्रथमोपचार करुन अधिक उपचारासाठी दापोलीला पाठवण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक हनुमंत फडतरे यांच्याकडून प्राप्त झाली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण-ठेकेदारांचा गलथान कारभार
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित ठेकेदार यांच्या गलथान कारभारामुळे चिंचाळी ते म्हाप्रळ या गावांच्या हद्दीतील रस्त्याची दुरवस्था झाली असून याकडे दुर्लक्ष केल्याने जनक्षोभ वाढला. यामुळे गणपतीच्या आधी माती व दगड टाकून खड्डे बुजवण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न समस्या कमी करण्याऐवजी त्यात भर टाकत आहे. यामुळे या रस्त्यावर दुचाकी, तीनचाकी व लहान चारचाकी वाहनांच्या लहान-मोठय़ा अपघातांची मालिका थांबलेली नाही. गणशोत्सवासाठी मंडणगड व दापोली तालुक्यात दाखल होणाऱया गणेशभक्तांचे चिखलाने स्वागत करण्याची जणू तयारीच प्राधिकरणाने केल्याचे दिसत आहे.
जि. प. सदस्य गोवळेंचे आज आंदोलन
गणेशोत्सवापूर्वी रस्ता वाहतुकीस योग्य करावा, यासाठी विविध स्तरावरुन प्राधिकरणाकडे मागणी होत असली तरी खड्डे बुजवण्यासाठी प्राधिकरणाने सप्टेंबर महिन्याचा मुहूर्त गाठला. त्यात बांधकामाचे नियम पाळण्यात न आल्याने खड्डे पडलेल्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आहे. रस्त्यावर ‘डायव्हर्शन’ असले तरी दिशादर्शक फलक व धोकादायक ठिकाणी बॅरिकेटस् आदी उपाययोजना करण्यात न आल्याने आपण प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन देत रस्त्याची परिस्थिती सुधारण्याची मागणी केली होती. मात्र यावर कोणत्याही उपाययोजना न झाल्याने व अपघातांची मालिका थांबलेली नसल्याने आपण 6 सप्टेंबर रोजी या रस्त्यावर आंदोलन करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य संतोष गोवळे यांनी माध्यमांकडे स्पष्ट केले आहे.