प्रतिनिधी/ बेळगाव
चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये रविवारी संचारबंदीसदृश स्थिती दिसून आली. रविवारी दिवसभर कडक लॉकडाऊन पाळण्याचा आदेश देण्यात आला होता. यामुळे जवळजवळ सर्वच दुकाने बंद होती. मात्र, या आदेशातून मांस विक्री दुकानांना सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु दिवसभर कडक लॉकडाऊन असल्याने ग्राहकांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच होती. यामुळे दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी असली तरी शहर आणि परिसरातील जवळजवळ सर्व मांस विक्रीची दुकाने बंदच ठेवण्यात आली होती. एकीकडे संचारबंदीसदृश लॉकडाऊनचा आदेश असताना चिकन व मटन खरेदीसाठी ग्राहक बाहेर येणार नाहीत याची पूर्वकल्पना दुकानदारांना असल्याने रविवारी चिकन व मटन विक्रीची दुकाने जवळजवळ बंदच ठेवण्यात आली होती.
शनिवारी सायंकाळी 7 पासूनच कडक लॉकडाऊन पाळण्याचा आदेश देण्यात आला होता. सोमवारी सकाळी 7 पर्यंत या आदेशाची अंमलबजावणी होणार होती. यामुळे रविवारी शहर आणि परिसरात संचारबंदीसदृश स्थिती दिसून आली. मात्र, या आदेशातून औषध दुकाने, इस्पितळे, रुग्णवाहिका, दूध विक्री याबरोबरच मांस विक्रीला वगळण्यात आले होते. मात्र, एकीकडे लॉकडाऊन कडक पाळण्याचा आदेश असताना तसेच अनावश्यक फिरणाऱयांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला असताना भाजी व मटण खरेदीसाठी बाहेर जाण्याचे धाडस सहजासहजी कोणीही करताना दिसून आले नाही. भाजी विक्रीसाठी परवानगी असतानाही शहर आणि परिसरात भाजी विक्रेते भाजी विकताना दिसून आले नाहीत. यामुळे एकीकडे लॉकडाऊन कडक करण्याचे आदेश देताना या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
रविवार हा मांसाहारी प्रेमींसाठी हक्काचा मानला जातो. यामुळे रविवारी चिकन व मटण विक्रीच्या दुकानात हमखास गर्दी दिसून येत असते. मात्र, या रविवारी लॉकडाऊन कडक पाळण्यात आल्याने तसेच संचारबंदी असल्याने परवानगी असूनही विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवणेच पसंत केले. ग्राहकांचा प्रतिसाद मिळणार नसल्याचा अंदाज घेऊन हा निर्णय घेतल्याचे काही दुकानदारांनी सांगितले. आधीच चिकन व मटणच्या दरात वाढ झाली असल्याने विक्रीवरही मर्यादा आली आहे, याचाही विचार करण्यात आल्याचे दुकानदारांनी सांगितले.