बीडीएफएचा बैठकीत निर्णय
प्रतिनिधी / बेळगाव
परवानगी न घेतलेल्या खेळाडूंवर कारवाई करण्याचा निर्णय रविवारी बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी पंढरी परब अध्यक्षस्थानी होते.
बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेला कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेने दिलेल्या नियमावलीनुसार कोणतीही फुटबॉल स्पर्धा सुरू करण्यापूर्वी स्थानिक जिल्हा संघटनेची परवानगी घेणे आवश्यक आहे. अन्यथा त्या स्पर्धेत खेळणाऱया रजिस्टर्ड खेळाडूंवर कारवाई करण्यात येते. याचे उल्लंघन झाल्यामुळे बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेने टिळकवाडी लेले मैदानावर सुरू असलेल्या फुटबॉल स्पर्धेतील संघटनेला ताकिद दिली आहे. या स्पर्धेत रजिस्टर्ड खेळाडूंनी भाग घेतल्यास त्या खेळाडूंवर दंडात्मक कारवाई व 5 वर्षाची बंदी घालण्यात येणार आहे. त्याशिवाय स्थानिक फुटबॉल पंचांनीही याची दखल घ्यावी, असे बेळगाव जिल्हा संघटनेने बैठकीत सांगितले. यापुढेही फुटबॉल स्पर्धा सुरू करण्यापूर्वी या संघटनेने रीतसर परवानगी घेऊनच स्पर्धेला सुरूवात करावी. अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. या बैठकीत पॅट्रॉन राम हदगल, उपाध्यक्ष रमेश गुर्जर, गोपाळ खांडे, सचिव अमित पाटील, लेस्टर डिसोझा, व्हिक्टर परेरा, एस. एस. नगरोडी, अल्लाबक्ष बेपारी उपस्थित होते.
मैदाने विनामूल्य उपलब्ध करून द्यावीत : पंढरी परब
माजी महापौर महेश नाईक यांच्या पहिल्या सर्वसाधारण बैठकीत बेळगावमधील सर्व मैदाने विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पंढरी परब यांनी मांडला होता. त्यावर सविस्तर चर्चा होऊन सर्व संमतीने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे बेळगावातील सर्व मैदाने खेळासाठी विनामूल्य करण्यात आली होती. पण महानगरपालिकेचा कार्यकाल संपल्यानंतर प्रशासकीय बैठकीत सदर मैदाने भाडेतत्त्वावर देण्याचे ठरविण्यात आले आणि त्यानुसार दररोज 4 हजार रूपयाचे शुल्क आकारण्याचा अन्यायकारक आदेश काढण्यात आला. आयुक्त के. जगदीश यांच्याशी चर्चा करून खेळाडूंवर होणाऱया अन्यायाची जाणीव करून दिली होती आणि शुल्क आकारणी रद्द करण्याची मागणीही केली होती. पण त्याची दखल घेतली गेली नाही. शुल्क आकारणीमुळे आयोजकांना स्पर्धा भरविणे कठिण बनले असून फुटबॉलपटू, फुटबॉल क्लब्स नाराज झाले आहेत. महानगरपालिकेने याची दखल घेऊन मैदाने पुन्हा विनाशुल्क करावित, अशी मागणी पंढरी परब यांनी केली आहे.