पोटनिवडणुकीतील पराभवानंतर निर्णय : नामदार जयंत पाटील यांना घेराव घातला नसता, तर निकाल वेगळा दिसला असता : चंडाळे यांची पत्रकार बैठकीत कबुली
सांगली/प्रतिनिधी
महापालिकेच्या प्रभाग १६ अ च्या पोटनिवडणुकीतील पराभवानंतर सेना उमेदवार महेंद्र चंडाळे यांनी आपल्या शिवसेना शहर प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. पत्रकार बैठकीत त्यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. नामदार जयंत पाटील यांना आमच्या लोकांनी घेराव घातला नसता तर नक्कीच आजचा निकाल वेगळा असता, अशी कबुलीही त्यांनी दिली. यापुढे फक्त एक शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या प्रभाग सोळा-अ मधून कॉंग्रेस आघाडीच्या तौफिक हारुण शिकलगार यांनी भाजपच्या अमोल गवळी यांचा तब्बल ३ हजार ९९५ मतांनी पराभव केला. शिकलगार यांना ७ हजार ४२९ तर गवळी यांना केवळ ३ हजार ४३४ मते मिळाली. मोठा गाजावाजा करून मैदानात उतरेलल्या भाजपला या पराभवाने मोठा धक्का बसला आहे. दरम्यान विजयानंतर
शिकलगार यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष साजरा केला. सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरवात झाली. एकूण चार फेऱ्यामध्ये मतमोजणी झाली. काँग्रेस आघाडीचे तौफिक शिकलगार यांना ७ हजार ४२९, भाजपचे अमोल गवळी यांना ३ हजार ४३४ शिवसेनेचे महेंद्र चंडाळे यांना ५३५, अपक्ष सुरेश सावंत ५८७, वंचित आघाडीचे उमरफारुक ककमरीरी २१ व समीर सय्यद १८ मते मिळाली.