प्रतिनिधी / मसुरे:
हडी येथील रहिवासी रुपा नारिंग्रेकर या मुंबई येथील कामा हॉस्पिटल येथे परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या गावात काम करणाऱया आरोग्य कर्मचारी, शिक्षक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडीसेविका व ग्रामपंचायत कर्मचाऱयांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. कोरोनासंदर्भात कशा पद्धतीने उपाययोजना केल्या पाहिजेत, याबाबत मार्गदर्शन केले.
रुपा नारिंग्रेकर या कामा हॉस्पिटलमध्ये कोव्हिड 19 या विषाणू संसर्गाबाबतचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या नर्स आहेत. त्यांनी वेळात वेळ काढून केलेले मार्गदर्शन आपल्या गावातील कर्मचाऱयांसाठी उपयोगी होते. हडी ग्रामपंचायतीतर्फे त्यांचे सरपंच महेश मांजरेकर यांनी आभार मानले.
याबाबत सरपंच मांजरेकर म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने ग्रामस्तरीय नियंत्रण समिती स्थापन केली आहे. या समितीने ग्रामीण पातळीवर जबाबदारी घेऊन काम करणे अपेक्षित आहे. या समितीच्या दिमतीला गावातील अंगणवाडीसेविका, आशास्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांची नियुक्ती केलेली आहे. ग्रामीण पातळीवर गावातील काही स्वयंसेवकही उत्स्फूर्तपणे काम करत आहेत. मात्र, असे असताना गावांमध्ये आज रेड झोन व कंटेनमेंट झोनमधून व्यक्ती मोठय़ा संख्येने येत आहेत. अशा व्यक्तींना गावातच संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्याची जबाबदारी या समितीची आहे. मात्र, समिती सदस्यांना ग्रामीण पातळीवर काम करताना विषाणू संसर्ग संबंधित प्राथमिक शिक्षणही दिलेले नाही. त्यामुळे अनेक कर्मचारी व ग्रामस्थांच्या मनात भीती अन् गैरसमज निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काम करताना आपली जबाबदारी पूर्ण करणे आवश्यक असल्याने प्रशिक्षित कर्मचाऱयाने अधिकाऱयांनी अशा व्यक्तींशी संवाद साधून प्राथमिक प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाली होती. यातूनच नारिंग्रेकर यांनी अशा व्यक्तींशी संवाद साधण्याची जबाबदारी घेतली. त्यांनी दिलेले प्रशिक्षण गावात कार्यरत असलेल्या व्यक्तींना समजावून सांगण्याची जबाबदारी घेतली. व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे रुपा नारिंग्रेकर यांनी कर्मचाऱयांशी संवाद साधला. या कर्मचाऱयांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे त्यांनी दिली. त्यामुळे ग्रामीण पातळीवर काम करणाऱया कर्मचाऱयांना याबाबत परिपूर्ण माहिती मिळाली. मनात शंकाकुशंका न ठेवता समाजाची कशी काळजी घ्यावी, यासाठी हे सर्व प्रतिनिधी काम करण्यास उत्साहित झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गावागावात काम करणाऱया स्वयंसेवक, कर्मचारी, अधिकाऱयांचे आपत्ती व्यवस्थापनाबाबत तत्काळ प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण पातळीवरील ग्रामस्थांचे प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन मांजरेकर यांनी शासनाला केले आहे.