उपक्रमाकडे दुर्लक्ष : महसुलावर परिणाम, प्रवाशांतून नाराजी
प्रतिनिधी / बेळगाव
प्रदूषण कमी व्हावे, इंधनाची बचत व्हावी, वाहतुकीच्या समस्येतून मुक्तता मिळावी व परिवहनच्या महसुलात वाढ व्हावी, या उद्देशाने सुरू केलेल्या ‘बस डे’ कडे दुर्लक्ष झाल्याने हा उपक्रम गेल्या दीड वर्षांपासून बंद पडला आहे. परिवहनतर्फे प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला बस डे चे आयोजन केले जाते. दरम्यान विद्यार्थी, नोकरदार तसेच इतर मंडळींनी एक दिवस आपल्या वाहनांना सुटी देऊन बसने प्रवास करावा, असा उपक्रमाचा उद्देश होता. सुरुवातीच्या काळात प्रवाशांचाही प्रतिसाद चांगला मिळाला. मात्र दीड वर्षातच हा परिवहनचा उपक्रम बंद पडला आहे.
सुरुवातीच्या काळात ‘बस डे’निमित्त शासकीय अधिकाऱयांना बोलावून ‘बस डे’ चे उद्घाटन केले जात होते. मात्र कालांतराने या उपक्रमाकडे कोरोनाकाळात दुर्लक्ष झाल्याने ‘बस डे’ची संकल्पना कुचकामी ठरली. त्यामुळे परिवहनच्या महसुलावरही पाणी फिरले आहे. जनजागृतीचा अभाव आणि नागरिकांनी दाखविलेली उदासीनता यामुळे ‘बस डे’ उपक्रम रखडला आहे. प्रवासी वाहतूक वाढावी, प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचा समतोल राखावा, यादृष्टीने सुरू केलेला हा उपक्रम काही दिवसातच बंद झाल्याने पर्यावरणप्रेमींतूनही नाराजी व्यक्त होत आहे.
महिलांसाठीची विशेष बससेवाही बंद…
बस डे बरोबरच महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहरात महिलांसाठी विशेष बससेवा धावत होती. मात्र त्याकडेही आता दुर्लक्ष झाल्याने ही बससेवा बंद झाली आहे. त्यामुळे महिलांतून नाराजी व्यक्त होत आहे.