प्रतिनिधी /बेळगाव
प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने सवलतीच्या दरात कार्गो कुरिअर सेवा सुरू केली आहे. राज्यात 109 बसस्थानकांतून ही सेवा पुरविली जात आहे. बेळगाव बसस्थानकातून ज्या ठिकाणी बस धावतात त्या ठिकाणी कुरिअर सेवा दिली जात आहे. अनलॉकच्या शिथिलतेनंतर सर्व प्रकारची बससेवा विविध मार्गांवर धावत आहे. त्यामुळे कुरिअर सेवेलाही प्रतिसाद वाढत आहे.
यापूर्वी एखादे पार्सल पोहोचवायचे झाल्यास ते बसचालक किंवा वाहकांकडे द्यावे लागत होते. तसेच धान्य व वस्तू स्वरूपात असल्यास त्याची (लगेज) पावती करावी लागत होती. त्या दरात तफावत दिसत होती. मात्र आता कार्गो सेवेमुळे प्रवाशांची सोय होऊन सवलतही मिळत आहे. दरम्यान पार्सल उशिराने पोहोचल्यास किंवा तांत्रिक अडचण आल्यास याला संबंधित आगार जबाबदार राहणार आहे.
पार्सल सेवा सुरू झालेल्या राज्यासह विविध मार्गांवर नवीन बस धावणार आहेत. त्यामुळे योग्य वेळेत पार्सल पोहोचणार आहे. त्यासाठी प्रत्येक आगारात त्याची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. दरम्यान कुरिअर विभागात पार्सल देऊन त्याची पावती घेऊन प्रवासी बसने प्रवास करू शकतात. बेळगाव बसस्थानकाच्या शेजारील सर्वच राज्यात ही सेवा सुरू केली आहे. त्यामुळे कार्गो सेवा प्रवाशांची सुरक्षित सेवा म्हणून पुढे येत आहे.