प्रतिनिधी /बेळगाव
मागील दोन वर्षात कोरोनामुळे परिवहन मंडळाला प्रचंड प्रमाणात फटका बसला आहे. कोरोनामुळे 145 कोटींचे नुकसान सोसावे लागले आहे. त्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी परिवहनचे प्रयत्न सुरू आहेत. याकरिता परिवहनने सर्व प्रकारची बससेवा सुरू करण्याबरोबरच ऑनलाईन बुकिंगही सुरू केले आहे. मात्र याला प्रवाशांचा प्रतिसाद अत्यल्प पहायला मिळत आहे.
कोरोनामुळे परिवहन आर्थिकदृष्टय़ा संकटात सापडले आहे. दरम्यान खात्याच्या तिजोरीत ठणठणाट असल्याने कर्मचाऱयांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होत आहे. विविध ठिकाणी बसफेऱया वाढवून परिवहनची चाके रस्त्यावर आणण्यासाठी खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप काही प्रवाशांच्या मनातून कोरोनाची धास्ती कमी झाली नाही. त्यामुळे ऑनलाईन तिकीट बुकिंग व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी बसस्थानकात आगाऊ बुकिंगची व्यवस्थाही केली आहे. मात्र तिकीट व्यवस्थेकडे प्रवाशांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे.
कोरोनामुळे बरेच उद्योगधंदे, व्यवसाय बंद झाल्याने बसप्रवास करणाऱया नोकर कामगारांची संख्या घटली आहे. कोरोनाच्या भीतीपोटी काहीजण स्वतःच्या दुचाकीवरून प्रवास करण्याला पसंती देत आहेत. त्यामुळे तिकीट बुकिंगला अद्याप प्रतिसाद वाढलेला नाही. सण व निवडणुकीच्या काळात तिकीट बुकिंग व्यवस्थेला प्रतिसाद वाढेल, अशी अपेक्षा परिवहनला होती. मात्र गणेशोत्सव काळातदेखील बुकिंगला प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. बसस्थानकातून राज्यांतर्गत व जिल्हय़ांतर्गत बससेवा सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळे महसुलात वाढ होत आहे. मात्र बुकिंगला अद्याप प्रतिसाद वाढला नाही. त्यामुळे परिवहनला अपेक्षित महसुलापासून दूर रहावे लागले आहे.