प्रतिनिधी/ बेळगाव
तात्काळ आरोग्य सुविधांच्या बाबतीत सोयीचे व्हावे म्हणून कर्नाटक राज्य परिवहन महामंडळातर्फे सुरू करण्यात आलेली बस रुग्णवाहिका वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बेळगाव विभागालाही प्राप्त करून देतो, असे आश्वासन दिले होते. मात्र, या आश्वासनाला आता दोन वर्षे उलटली तरी तशी सेवा उपलब्ध करून देण्याकडे परिवहन महामंडळाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे घोषणा करून नागरिकांची दिशाभूल करण्यातच धन्यता मानण्यात येत आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
अशा प्रकारचा परिवहन मंत्रालयाचा हा पहिलाच उपक्रम असून सर्व प्रकारची सुसज्ज आरोग्य सुविधा या बसमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार होती. मात्र, तसे झाले नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. तत्कालीन परिवहन मंत्री एच. एम. रेवण्णा यांनी याची घोषणा केली होती. मात्र, तसे झालेच नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
‘अपघात निवारण वाघीण’ असे नामकरण या बस रुग्णवाहिकेला देण्यात आले होते. 8 प्रकारच्या गंभीर दुखापती आणि 16 प्रकारच्या साध्या दुखापतींवर उपचार करण्याची क्षमता या बसमध्ये असणार होती. इसीजी, पल्स ऑक्सीमीटर, ऑक्सीजन तसेच संपर्काची साधने यांचा समावेश या बसमध्ये केला जाणार होता. मात्र, अजून तरी तशा प्रकारची बस बेळगावला देण्यात आली नाही. केवळ घोषणा आणि वल्गना करण्यातच धन्यता मानण्यात आली आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गोल्डन हावर ट्रस्ट या संस्थेशी समन्वय करून परिवहनने ही बससेवा उपलब्ध करून नागरिकांच्या सेवेसाठी दाखल करण्याचा मनोदय होता. परिवहन मंत्रालयाला या ट्रस्टने प्रथमोपचाराचे 400 संच मोफत उपलब्ध केले होते. या संचांचा वापर केला जाणार होता. मात्र माशी कोठे शिंकली याचा पत्ता नाही. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.