बेळगाव ः / प्रतिनिधी
कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून परिवहन मंडळ आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडले आहे. परिवहनच्या तिजोरीत ठणठणाट निर्माण झाल्याने कर्मचाऱयांना वेतन देणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत परिवहनच्या मदतीला राज्य सरकार धावून आले आहे. वायव्य कर्नाटक परिवहन व बेंगळूर महानगर परिवहन मंडळाला राज्य सरकारने 103.20 कोटी अनुदान मंजूर केले आहे. यातून कर्मचाऱयांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील वेतन अदा केले जाणार आहे. याबाबत सरकारने परिवहन मंडळांना आदेश जारी केला आहे.
परिवहन मंडळ व बेंगळूर महानगर परिवहन मंडळांच्या खर्चाचे प्रमाण अधिक आहे. त्यातच कोरोनामुळे उत्पन्न कमी झाल्याने परिवहनला आर्थिक चणचण भासत आहे. दरम्यान दोन्ही मंडळांना कर्मचाऱयांच्या वेतनासाठी निधी कमी पडत होता. वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाला 22 कोटी तर बेंगळूर महानगर परिवहनला 81 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. दोन्ही मंडळांना तब्बल 103.20 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे परिवहन कर्मचाऱयांना लवकरच वेतन मिळणार आहे.
कोरोनामुळे मागील दोन वर्षांत परिवहनला प्रचंड तोटा
कोरोनामुळे मागील दोन वर्षांत परिवहनला प्रचंड तोटा सहन करावा लागला आहे. काहीकाळ बस जाग्यावर थांबून होत्या. त्यामुळे आर्थिक उलाढाल ठप्प होऊन परिवहनला कोटय़वधी रुपयांचा फटका बसला. त्यामुळे कर्मचाऱयांचे वेतन देण्यासाठी निधीची कमतरता जाणवत आहे. दरम्यान बससेवेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने परिवहनला अद्याप उत्पन्नापासून दूर रहावे लागले आहे. परिणामी परिवहनच्या तिजोरीत ठणठणाट निर्माण झाल्याने कर्मचाऱयांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे परिवहन आर्थिक अडचणीत सापडले असताना राज्य सरकार परिवहनच्या मदतीला धावून आले आहे. त्यामुळे लांबणीवर पडलेले कर्मचाऱयांचे वेतन अदा केले जाणार आहे.