सोमवारपासून संप आणखी तीव्र होणार
प्रतिनिधी / बेंगळूर
वेतनवाढ, सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा देण्यासह अनेक मागण्यांसाठी राज्य परिवहन कर्मचाऱयांनी पुकारलेला संप बाराव्या दिवशीची सुरूच होता. त्यानुसार सोमवारपासून संप आणखी तीव्र होणार आहे. वेतन वाढीच्या बाबतीत राज्य सरकार आणि परिवहन कर्मचाऱयांमध्ये निर्माण झालेल्या तिढय़ामुळे प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
यामध्येच परिवहन कर्मचारी संघाने सोमवारपर्यंत राज्य सरकारला डेडलाईन दिली असून चर्चेला पुढाकार न घेतल्यास जेल भरो आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. परिवहन कर्मचाऱयांचा राज्य सरकार अवमान करीत असल्याने कर्मचाऱयांच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. सरकार मुक्तपणे चर्चा करून समस्या दूर करणे आवश्यक असताना कोरोनाच्या नावाखाली याकडे दुर्लक्ष करीत आहे. अनेक कर्मचाऱयांना कारण न देताच अटक करण्यात येत आहे, असा आरोप कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी केला.
आजपासून जेल भरो आंदोलन राज्य सरकारच्या धोरणेचे खंडन करून लाखो कर्मचारी कारागृहात जाण्यास तयार आहेत. सोमवारपासून जेल भरो आंदोलन प्रारंभ करण्यात येणार आहे. तसेच याला सरकारच जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. संपामुळे राज्यात पूर्ण बससेवा सुरू झालेली नाही. अधिकाऱयांच्या कठोर उपाययोजनांमुळे 30 टक्के बसेस रस्त्यावर धावले आहेत. केएसआरटीसीच्या 2,245 आणि बेमटीसीच्या 959 बसेसह एकूण 4886 बसेस रविवारी सकाळी 11 पर्यंत रस्त्यावर धावल्या असून त्यांना पोलीस सुरक्षा देण्यात आली होती. तसेच बस वाहतुकीस अडथळा आणणाऱया एकूण 368 कर्मचाऱयांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.