मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत आंदोलनाचा सरकारला इशारा
प्रतिनिधी/ बेंगळूर
मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन करणे अनिवार्य असल्याचा संदेश राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱयांनी सरकारला दिला आहे. अनेक दिवसांपासून मागण्यांची पूर्तता न झाल्याने 18 मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा परिवहन कर्मचाऱयांनी राज्य सरकारला दिला आहे.
परिवहन कर्मचाऱयांनी संपाचा इशारा दिल्यामुळे राज्य सरकारची पुन्हा कोंडी झाली आहे. कोरोनामुळे आर्थिक संकट निर्माण झाले असताना परिवहन कर्मचाऱयांच्या मागण्या पूर्ण करणे किंवा फेटाळून लावणे अशा पेचात सरकार सापडले आहे. राज्य रस्ते परिवहन महामंडळ, बेंगळूर शहर परिवहन मंडळ, वायव्य आणि ईशान्य परिवहन निगमच्या कर्मचाऱयांनी मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारवर दबाव आणला आहे. कर्नाटक राज्य रस्ते परिवहन मजदूर संघटनेने प्रमुख चार मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेंगळूरच्या फ्रीडम पार्कवर धरणे आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याबरोबरच 9 मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी करून मौर्य सर्कलपासून मोर्चा काढण्यात येणार आहे. हजारो कर्मचारी आंदोलनात सहभागी होतील. यामुळे राज्यात परिवहनच्या बससेवेत व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी परिवहन कर्मचाऱयांनी 6 प्रमुख मागण्या समोर ठेवून चार दिवस संप पुकारला होता. त्यावेळी सरकारने मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यातील काही मागण्या अजूनही मान्य झाल्या नसल्याने पुन्हा एकदा परिवहन कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत.