चंद्रकांत सूर्यवंशी यांची निवड निश्चित : बुधवारी औपचारिक घोषणा : 19 दिवस पद भूषविण्याची संधी
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत सूर्यवंशी यांची निवड निश्चित झाली आहे. प्रतिज्ञा उत्तुरे यांनी राजिनामा दिल्याने रिक्त झालेल्या परिवहन सभापतीपदासाठी शुक्रवारी सूर्यवंशी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला. बुधवारी (दि. 28) निवडीची औपचारिक घोषणा होणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक सूर्यवंशी हे शहरात चंदू मेस्त्राr म्हणून परिचित आहेत. शिवाजी पेठेतील खंडोबा तालमीचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांचा सामाजिक कार्यात सहभाग आहे.
ट्रकसह अवजड वाहनांचे मेकॅनिक असणारे सूर्यवंशी हे पांजरपोळ येथील राजर्षी शाहू लघू औद्योगिक असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. गेली पाच वर्षे ते परिवहन समितीचे सदस्यही आहेत. त्यांच्या रूपाने परिवहन समितीला प्रथमच मेकॅनिक सभापती लाभला आहे. 15 नोव्हेंबरला महापालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत संपणार आहे. त्यामुळे सूर्यवंशी यांना 19 दिवस परिवहन सभापतीपद भूषविता येणार आहे.