प्रतिनिधी/ नागठाणे
मसूर (उंब्रज) येथे होणाऱया आयटीआय परीक्षा देण्यासाठी दुचाकीवरुन निघालेल्या विद्यार्थ्याचा आशियायी महामार्गावर वळसे (ता. सातारा) येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. दुचाकीवर पाठीमागे बसलेला एकजण गंभीर जखमी झाला. रविवारी सकाळी हा अपघात झाला. ऋषिकेश चंद्रकांत गोळे (वय 21, रा. हिलरेंज माध्यमिक विद्यालय, भिलार, महाबळेश्वर, जि. सातारा) असे मृत युवकाचे नाव असून अविनाश दिलीप गोळे (रा. करहर, ता. जावली) असे जखमीचे नाव आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मसूर येथे होणाऱया आयटीआय परीक्षेसाठी भिलार दोन विद्यार्थी दुचाकीवरुन निघाले होते. रविवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास वळसे येथील अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीसमोर कराड बाजूकडे जाणाऱया महामार्गावर होंडा शाईन या दुचाकीला भीषण अपघात झाला. नेमका अपघात कसा झाला याची माहिती मिळू शकली नाही.
यामध्ये दुचाकीचालक ऋषिकेश चंद्रकांत गोळे याच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेला अविनाश दिलीप गोळे हा गंभीर जखमी झाला. जखमी युवकास ग्रामस्थांनी तत्काळ उपचारासाठी सातारा येथे पाठविले. त्याच्यावर सातारा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनास्थळी बोरगाव पोलीस व कराड महामार्ग पोलीस यांनी धाव घेतली.
ऋषिकेश चंद्रकांत गोळे याचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याने गोळेवाडी गावावर मोठय़ा प्रमाणात शोककळा पसरली आहे. ऋषिकेश हा पाचगणी येथील गोडोली औद्योगिक प्रशिक्षण केंद्र संस्था येथे आयटीआय शिक्षण घेत होता.
त्याची परीक्षा उंब्रज येथे होती. त्याच्याबरोबरच आयटीआयचे शिक्षण घेणारा अविनाश गोळे देखील परीक्षेला जात होता. तोही गंभीर जखमी झाला आहे.
अपघातानंतर महामार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला काढून वाहतुक सुरळीत केली. अपघाताची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय देसाई व हवालदार प्रकाश वाघ करत आहेत.