पणजी मनपाला खंडपीठाचा आदेश
प्रतिनिधी / पणजी
पणजी महापालिकेने कांपाल येथील परेड मैदानावर टाकलेल्या कचऱयापैकी विलगीकरण न केलेला 800 क्युबिक मीटर कचरा 30 दिवसांच्या आत हिरा पेट्रोलपंपच्या मागे असलेल्या कचरा विल्हेवाट प्रकल्पात स्थलांतर करण्यात यावा व उर्वरित 3 हजार क्युबिक मीटर रेमिडायड केलेला कचरा नोव्हेंबर 2020 पर्यंत स्थलांतर करून 19 डिसेंबर गोवा मुक्तीदिनासाठीच्या कार्यक्रमासाठी मैदान तयार करून द्यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला आहे.
कांपाल परेड मैदानावर दरवर्षी गोवा मुक्ती दिनाचा कार्यक्रम 19 डिसेंबर रोजी होत होता. पण संपूर्ण मैदान कचऱयाने भरल्याने या मैदानावरील कार्यक्रम थांबले आहेत.
सदर मैदानावर 2016 पासून कचरा टाकला जात नाही व यापुढे टाकला जाणार नाही, असे आश्वासन पणजी महापालिकेच्या वतीने देण्यात आले. यावेळी मनपाचे आयुक्त न्यायालयात हजर होते. रेमिडायड केलेला कचरा कर्नाटकातील सिमेंट कंपनीसाठी उपयुक्त आहे. पण पावसामुळे तो स्थलांतर करणे शक्य नाही, असे मनपाच्या वतीने खंडपीठाला सांगितले. सदर कचरा नोव्हेंबर अखेरपर्यंत टप्प्याटप्प्याने स्थलांतर करण्यात यावा. तोपर्यंत ताडपत्रीने झाकून ठेवावा, असा आदेश खंडपीठाने दिला.