पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता : चोवीस तासांत सर्वाधिक पाऊस पेडणेत,मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन
प्रतिनिधी /पणजी
अखेर मान्सूनने गोव्याला धडक दिली. गुरुवारी रात्री हलक्या स्वरुपात पावसाला प्रारंभ झाला आणि शुक्रवारी दिवसभरात संपूर्ण गोव्यात मान्सूनने जोरदार सलामी दिली. कारवारमध्ये साधारणतः नऊ दिवस मुक्काम ठोकून मान्सून काल शुक्रवारी पहाटे गोव्यात पोहोचला. गोव्यातून तो कोकणातदेखील पोहोचला. पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दि. 14 जूनपर्यंत हवामान खात्याने एलो अलर्ट जारी केले आहे.
तब्बल सहा दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मान्सूनचे गोव्यात आगमन झाले. नियमित वेळेच्या चार दिवस अगोदर त्याचे आगमन केरळमध्ये झाले होते, मात्र केरळमध्येच त्याची तीव्रता कमी झाली आणि कारवारला येईपर्यंत तो गायब झाला.
राज्यात सर्वत्र दमदार पाऊस
पणजी हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सून कारवारमध्ये नऊ दिवस राहिला. काल शुक्रवारी पहाटे तो गोव्यात व नंतर कोकणमध्ये पोहोचला. मान्सूनच्या पहिल्याच दिवशी पणजीसह राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. पेडणेमध्ये रात्रभर जोरदार पाऊस पडला व तिथे जवळपास दोन इंच एवढी नोंद झाली. पणजीत जवळपास 1 इंच, काणकोणमध्ये 1 इंच तर सांगेमध्ये सव्वा इंच एवढी दमदार नोंद झाली. शुक्रवारी सकाळी 8.30 ते सायं. 5.30 या दरम्यान गोव्यात सुमारे पाउण इंच पावसाची दमदार नोंद झाली.
एक जूनपासून 2 इंच पाऊस
हवामान खात्याने राज्यात आज जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली होती. पहाटेपासून पणजी व आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस झाला तर राज्यातील इतर भागात त्या तुलनेत कमी पाऊस होता. मात्र दुपारपासून राज्यात सर्वत्रच जोरदार पाऊस झाला. काही भागात विजांच्या गडगडाटासह पाऊस पडला. यंदा उशिराने पाऊस सुरु झाल्याने आतापर्यंतच्या वार्षिक सरांसरीच्या तुलनेत तो 3 इंच कमीच आहे. 1 जूनपासून 2 इंच एवढी पावसाची नोंद झालेली आहे.
मुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याने गोव्यात दि. 14 जूनपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सर्वत्र विजांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असे म्हटले आहे. दि. 10 ते 14 जून या दरम्यान मुसळधार पाऊस संपूर्ण गोवाभर पडणार आहे. अरबी समुद्र खवळलेला राहील आणि वाऱयाचा वेग ताशी 40 किमी वरुन 60 किमी असा राहील. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशाराही हवामान खात्याने दिलेला आहे.
गेल्या 24 तासात गोव्यात सर्वाधिक
- पेडणे 2 इंच
- म्हापसा अर्धा इंच
- फोंडा 4 मि.मी.
- पणजी 1 इंच
- जुने गोवे अर्धा इंच
- सांखळी 1.2 मि.मी.
- काणकोण 1 इंच
- दाबोळी 1 इंच
- मडगाव 4.8 मि.मी
- मुरगाव 7.2 मि.मी.
- केपे 6.2 मि.मी.
- सांगे दीड इंच